Join us

पाच दिवसांच्या घसरणीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2015 2:14 AM

शेअर बाजारात पाच दिवसांपासून सुरू असलेले घसरणीचे सत्र अखेर बुधवारी थांबले. ‘सन फार्मा’सारख्या तगड्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्यामुळे

मुंबई : शेअर बाजारात पाच दिवसांपासून सुरू असलेले घसरणीचे सत्र अखेर बुधवारी थांबले. ‘सन फार्मा’सारख्या तगड्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स २१४ अंकांची उसळी घेत दिवसअखेर २७,८९०.१३ अंकांवर स्थिरावला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मंजूर केले जाणार असल्याचे म्हटल्यामुळेही खरेदीदारांचा उत्साह वाढला, असे दलालांनी सांगितले. मात्र या उसळीला सलग दुसऱ्या वर्षीही मान्सून सामान्य पातळीहून कमी राहण्याचा अंदाज तसेच पूर्वलक्षी प्रभावाने करवसुली व उद्योगांच्या लाभाविषयीच्या चिंतेने काहीअंशी ग्रहण लागले, असे दलालांनी म्हटले. आजच्या चढउताराच्या व्यवहारादरम्यान ३० शेअर्सचा सेन्सेक्स सुरुवातीला मूल्याधारित खरेदीमुळे १५१ अंकांनी चढला. मात्र, त्यानंतर यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज पुढे आल्यानंतर नकारात्मक वातावरण तयार होऊन सेन्सेक्स दिवसाच्या सर्वात नीचांकी स्तरावर अर्थात २७,३८५.४८ अंशावर आला. मात्र, अखेरच्या तासात खरेदीची लाट आल्यामुळे सेन्सेक्स दिवसातील उच्चांकी २७,९४७.२६ अंकावर पोहोचला. दिवसअखेर तो २१४.१९ अंकासह किंवा ०.७७ टक्क्यांसह २७,८९०.१३ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) ५१.९५ अंकाची उसळी घेत ८,४२९.७० अंशावर स्थिरावला. फायद्यात राहिलेल्या कंपन्यांपैकी हिंदुस्तान युनिलिव्हरला सर्वाधिक म्हणजे ३.५९ टक्के लाभ झाला. सन फार्माच्या समभागांनीही आज पुनरागमन केले. जपानच्या दाईची सँक्यो कंपनीने सन फार्मातील आपली सर्वच्या सर्व २०,०२५ कोटींची गुंतवणूक काढून घेतल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या किमतीत मंगळवारी घसरण झाली होती. मात्र, आज कंपनीच्या शेअरची किंमत १.६३ टक्क्यांनी वाढून ९६७.१५ रुपयांवर पोहोचली.