बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांची मागणी आता पूर्ण होऊ शकते. या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच फाइव्ह डे वीक (five day week) सुविधा लागू होऊ शकते. यासंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज यांच्यात सहमती झाली आहे. मात्र महिन्यातील दोन सुट्ट्या वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळही वाढविला जाणार आहे.
रोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागणार - नव्या सहमतीनुसार बँक कर्मचाऱ्यांना रोज ४० मिनिटे अधिक काम करावे लागणार आहे. रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. मात्र आता येत्या काळात प्रत्येक शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत. लवकरच ही नवीन व्यवस्था सुरू होऊ शकते. यासंदर्भात असोसिएशननेही सहमती दिली आहे. बँक युनियनकडून गेल्या अनेक दिवसांपासून फाइव्ह डे वर्किंग करण्यासंदर्भात मागणी होत होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, कर्मचाऱ्यांना सकाळी 9.45 वजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत रोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयबीएकडून या प्रस्तावावर सहमती दर्शवण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, अधिकांश ग्राहक मोबाईल बँकिंग, एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करतात. पण खरे तर, अद्यापही मोठ्या प्रमाणावर ग्राहक बँकेच्या शाखेतच जाणे पसंत करतात.