- सोपान पांढरीपांडेनागपूर : रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर व बंगालमधील सालबनी या छापखान्यांनी ५०० व २००० च्या नोटांची छपाई सुरू केली असली तरी नोटाटंचाई संपून मुद्रा पुरवठा पूर्ववत व्हायला अजून पाच आठवडे लागणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक नोट मुद्रणच्या सूत्रांनी दिली आहे.सरकारी बँकांची स्थिती नाजूक झाल्याची अफवा पसरल्यानंतर आंध्र प्रदेश व तेलंगणामधील जनतेने एक महिन्यात ४५ हजार ते ५0 हजार कोटी रुपये रक्कम बँकांमधून काढून घेतले. हे लोण अन्य राज्यांत पसरले. हा पैसा परत बँकांत न आल्यामुळे नोटाटंचाई जाणवू लागली असे कळते.भारताचा जीडीपी १८५ लाख कोटी रुपये आहे. साधारणत: जीडीपीच्या १२ टक्के रक्कम बँका व जनतेजवळ असली तर सर्व व्यवहार सुरळीत चालतात. त्यामुळे बँका व जनतेजवळ २२.२० लाख कोटी हवेत. पण प्रत्यक्षात ही रक्कम १८.४० लाख कोटी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तुटवडा ३.८० लाख कोटींचा आहे. पण यापैकी १.८० लाख कोटी तुटवडा डिजिटल पेमेंटसने भरून निघतो, म्हणून निव्वळ टंचाई २.०० लाख कोटी आहे, अशी माहिती या सूत्राने दिली.रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर वसालबनी छापखान्यांत ५०० व २००० च्या नोटा छापतात. त्यांची छपाई क्षमता आठवड्याला ४०,००० कोटींच्या नोटा छापण्याची आहे. त्यामुळे २.०० लाख कोटींची मुद्राटंचाई संपायला पाच आठवडे लागतील, अशी माहिती आहे.
नोटाटंचाई संपायला लागणार पाच आठवडे; रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण विभागाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:51 AM