८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ५०० रूपयांच्या आणि १ हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. परंतु आता नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण झाली आहे. असं असलं तरी सध्या आता देशात हळहळू का होईन रोख रकमेचे व्यवहारही वाढू लागले आहेत. पण याची एक सकारात्मक बाब म्हणजे डिजिटल पेमेंटदेखील पूर्वीच्या तुलनेत वाढलं आहे. यावरून हळूहळू का होईना पण आपण कॅशलेस इकॉनॉमीकडेही जात असल्याचं दिसत आहे.
गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात कोरोना महासाथीमुळे लोकांनी रोख रकमेचा वापर अधिक केला होता. परंतु या दरम्यान, नेट बँकिंग, कार्ड आणि UPI द्वारे होणारे व्यवहारही वाढले आहेत. या सर्वात UPI मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये लोकप्रिय झाल्याचं दिसून आलं होतं.
काय सांगते RBI ची आकडेवारी?
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ४ नोव्हेंबर २०१६ मध्ये १७.९४ लाख कोटी रूपयांची रोख रक्कम चलनात होती. तर २९ ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन ती २९.१७ लाख कोटी रूपयांवर पोहोचली. आकडेवारीनुसार मूल्य आणि प्रमाणानुसार आर्थिक वर्ष २०२१-२१ दरम्यान अनुक्रमे १६.८ टक्के आणि ७.२ टक्के वाढ झाली. तर २०१९-२० दरम्यान १४.७ टक्के आणि ६.६ टक्क्यांची वाढ दिसून आली.
UPI ग्राहकांची संख्या वाढली
२०१६ मध्ये UPI लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आतापर्यंत याद्वारे व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ४२१ कोटी ट्रान्झॅक्शन युपीआयद्वारे करण्यात आले होते. जर रकमेच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर युपीआयद्वारे ७.७१ लाख कोटी रूपयांचं ट्रान्झॅक्शन करण्यात आलं होतं.
काय आहे तज्ज्ञांचं मत?
ANAROCK समुहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या मते नोटबंदीनंतर त्वरित याबाबत थोडा संशय होता. परंतु आता हळूहळू स्थिती सामान्य होत आहे. रोख रकमेचे व्यवहार पूर्णपणे थांबले आहेत असं सांगता येणार नाही. परंतु ते मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. परंतु आताही ५०० रूपयांपर्यंतच्या खर्चासाठी लोक रोख रकमेचाच वापर करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.