नवी दिल्ली : मागील वर्षात देशातील आघाडीच्या सात शहरांमध्ये विकल्या गेलेल्या फ्लॅटचा सरासरी आकार ११ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनी ॲनारॉकच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालासाठी ॲनारॉकने मुंबई-एमएमआर, कोलकाता, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळुरू, पुणे आणि चेन्नई या सात प्रमुख शहरांमध्ये विकल्या गेलेल्या फ्लॅटच्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. बांधकाम कंपन्याही मोठ्या आकाराचे फ्लॅट बांधण्यावर भर देताना दिसत आहेत.
सात शहरांमध्ये विकल्या गेलेल्या फ्लॅटचा सरासरी आकार वाढून १,३०० चौरस फूट इतका झाला आहे. २०२२ मध्ये फ्लॅटचा आकार १,१७५ चौरस फूट इतका होता. २०२३ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र आणि कोलकात्यामध्ये फ्लॅटचा आकार कमी झाला. तर दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि चेन्नईमध्ये फ्लॅटचा आकार वाढलेला दिसत आहे. (वृत्तसंस्था)
दिल्ली-एनसीआर परिसरात मागील वर्षात विकल्या गेलेल्या फ्लॅटचा आकार सर्वाधिक ३७ टक्क्यांनी वाढला आहे.
मागच्या वर्षी लक्झरी घरांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. सुरू झालेले २३ टक्के नवे प्रकल्प लक्झरी घरांच्या श्रेणीतील होते. कोरोना काळात अशा घरांना मागणी वाढली होती. परंतु आजही या घरांची मागणी कमी होताना दिसत नाही.