नवी दिल्ली - अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताला तेल पुरवठा करताना, लवचिक धोरण स्वीकारण्याची तयारी इराणने दर्शविली आहे. तेलाची वाहतूक जवळपास मोफत करणे, तसेच तेलाच्या मोबदल्यासाठी वाढीव मुदत देण्याचा प्रस्ताव इराणने दिला आहे.इराणच्या नवी दिल्लीतील दूतावासाने निवेदन काढून ही माहिती दिली. इराण हा भारताचा तिसरा मोठा तेल पुरवठादार देश आहे, तसेच भारत हा इराणचा दुसरा मोठा तेल खरेदीदार ग्राहक आहे. चीन हा इराणचा सर्वांत मोठा तेल खरेदीदार आहे.अमेरिकेने इराणसोबतचा अणुकरार रद्द केला असून, इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणकडून तेल घेणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे. त्यामुळे इराणचा तेलपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारताने आपल्या रिफायनरींना इराणकडील तेल खरेदी कमी करण्याच्या सूचना गेल्याच महिन्यात दिल्या आहेत. शक्य झाल्यास इराणकडील तेल खरेदी शून्यावर आणण्यास रिफायनरींना सांगितले आहे.इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अस्थिर तेल बाजारातील भारताच्या अडचणी आम्ही समजू शकतो. भारताला होणाºया तेल पुरवठ्याच्या सुरक्षेची आम्ही नेहमीच काळजी घेतली आहे. यापुढेही ती घेतली जाईल.इराणच्या निवेदनावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते प्रवीश कुमार यांनी सांगितले की, आमचे इराणसोबत मजबूत संबंध आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.मोजक्या देशांत भारतदरम्यान, टँकर आगमन डाटानुसार, मे महिन्याच्या तुलनेत जूनमधील इराणी तेलाची भारतात होणारी आयात १६ टक्क्यांनी घसरली. या आधीच्या अमेरिकी निर्बंधांच्या काळात इराणकडून तेल खरेदी करणाºया मोजक्या देशांत भारताचा समावेश होता. बँकिंग, विमा आणि शिपिंग साखळीत अडथळे निर्माण झाल्यामुळे भारताने इराणी तेलाची आयात मात्र कमी केली होती.
इराण देणार भारताला सवलती, तेलाबाबत लवचिक धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 7:02 AM