Flipkart in Loss : काही दिवसांपूर्वीच दिग्गज ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने 'बिग बिलीयन डे' शॉपिंग फेस्टीवल आयोजित केला होता. यामध्ये कंपनीच्या फ्लॅटफॉर्मवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. फ्लिपकार्ट दररोज लाखोंच्या उत्पादनांची विक्री करत आहे. सणासुदीच्या काळात विक्रीचा आकडा कोटींवर पोहोचतो, इतक्या विक्रीनंतरही ही कंपनी तोट्यातच आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचा निव्वळ तोटा कमी होऊन ४,२४८.३ कोटी रुपयांवर घसरला आहे. तरी देखील फ्लिपकार्ट तोट्यातच राहिली आहे. टॉफलरने शेअर केलेल्या नियामक अहवालातून ही बाब समोर आली आहे. उत्पन्न वाढल्यामुळे कंपनीचा तोटा कमी झाला आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीने ४,८९७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला होता. २०२३-२४ या आर्थिक वर्षात 'स्टॉक इन ट्रेड' खरेदीवरील कंपनीचा खर्च जवळपास २४ टक्क्यांनी वाढून ७४,२७१.२ कोटी रुपये झाला, जो २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५९,८१६.६ कोटी रुपये होता.
5 वर्षातील सर्वात कमी नुकसानफ्लिपकार्टचा इक्विटीवरील परतावा गेल्या ५ वर्षांतील सर्वात निच्चांकी पातळीवर घसरला असून नकारात्मक ४९.६ टक्क्यांवर राहिला. कंपनीसाठी नियोजित भांडवलावर परतावा देखील गेल्या ५ आर्थिक वर्षांमध्ये सर्वात कमी म्हणजे नकारात्मक ५४.०९ टक्के होता. वॉलमार्ट समूह कंपनीचा एकत्रित महसूल २०२२-२३ मधील ५५,८२३.९ कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये सुमारे २६ टक्क्यांनी वाढून ७०,५४१.९० कोटी रुपये झाला.
कंपनी मोठा डिस्काउंट कशी देते?फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबत किरकोळ विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या कंपन्या उत्पादनांवर भरघोस सूट कशी देतात? यावरुन व्यापारी संघटनांनी धक्कादायक आरोप केलेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन स्पर्धेतून उत्पादनांवर बंपर सवलत देत आहेत. मात्र, हा तोटा भरून काढण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळत आहे. त्यांना मिळत असलेली गुंतवणूक ते रोख खर्च करण्यासाठी आणि भारतात ऑपरेशनसाठी लागणारा खर्च भरुन काढण्यासाठी करत आहेत.