Join us

फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरील महासेलला दणका; एफडीआयचे नियम कठोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 10:44 AM

ऑनलाईन रिटेलमध्ये एफडीआयचे नवीन नियम फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील.

नवी दिल्ली : विदेशी गुंतवणुकीतून चालणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या महासेलना चाप बसणार आहे. केंद्र सरकराने फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना एक्स्लुझिव्ह डील ग्राहकांना देण्यावर बंदी आणली आहे, ज्यामध्ये उत्पादनांच्या किंमती प्रभावित होऊ शकतील. याचबरोबर या कंपन्यांची भागीदारी असलेल्या कंपन्यांची उत्पादनेही या विकता येणार नाहीत. 

ऑनलाईन रिटेलमध्ये एफडीआयचे नवीन नियम फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील. यामध्ये या कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, सर्व पुरवठादारांना कोणताही भेदभाव न करता एकसारखी सुविधा देण्यात यावी. कोणत्याही पुरवठादारला (व्हेंडर) त्याच्या उत्पादनांच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादने ऑनलाईन विकता येणार नाहीत. शिवाय त्या पुरवठादाराला केवळ आपल्याच प्लॅटफॉर्मवर त्याची उत्पादने विकण्याची सक्ती करू शकणार नाहीत. याचाच अर्थ आता कोणताही मोबाईल किंवा वस्तू सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना दिला जाणारा कॅशबॅकचा फायदा निष्पक्ष आणि भेदभाव करणारा असता कामा नये. कंपन्यांना हे नियम पाळण्यासंबंधात दरवर्षी 30 सप्टेंबरला आरबीआयकडे प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. 

एफडीआयमुळे भारतीय कंपन्यांना उतरती कळा लागण्याची भीती व्यक्त होत होती. यामुळे या कंपन्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एफडीआयमुळे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू लागल्याने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर सूट देत होत्या. यामुळे भारतीय कंपन्यांना नुकसान होत होते. 

स्नॅपडीलने या निर्णयाचे स्वागत केले असून अॅमेझॉन या नियमांचा अभ्यास करत आहे. शिवाय पुरवठादारांच्या संघटनेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

टॅग्स :परकीय गुंतवणूकफ्लिपकार्टअॅमेझॉनकेंद्र सरकार