नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा आणली आहे. आता कंपनी आरोग्यसेवा क्षेत्रात उतरणार आहे. वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने नवीन आरोग्य अॅप लाँच केले आहे. फ्लिपकार्ट हेल्थ प्लस (Flipkart Health+) असे या अॅपचे नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून कंपनी लोकांना आरोग्य सुविधा पुरवणार आहे. यासोबतच आता लोकांना फार्मसी, नेटमेड्स, अपोलो 24*7 यासारख्या अनेक कंपन्यांसोबत एक नवीन आरोग्य अॅपचा लाभ मिळणार आहे.
एका न्यूज वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कंपनीने म्हटले आहे की, ही सुविधा ग्राहकांना 20 हजारांहून अधिक पिनकोडवर दिली जाईल. यासोबतच 500 हून अधिक औषध विक्रेते या नेटवर्कशी जोडले जातील आणि लोकांपर्यंत औषधे लवकरच आणि स्वस्त दरात पाठवली जातील. अॅप वापरताना लोकांना त्यांचे औषध प्रिस्क्रिप्शन अपलोड करावे लागेल. यानंतर कंपनी लवकरात लवकर त्यांच्या औषधाच्या पत्त्यावर पोहोचेल.
'आरोग्य सेवेकडे अधिक लक्ष'
फ्लिपकार्ट हेल्थ प्लसचे सीईओ प्रशांत झवेरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आता भारतीय लोक कोरोनाच्या काळात त्यांच्या आरोग्य आणि आरोग्य सेवेकडे अधिक लक्ष देत आहेत. हे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. लोकांमध्ये आरोग्य सुविधांबाबत जागरुकता वाढली आहे, असेही ते म्हणाले.
गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकते
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लिपकार्ट हेल्थ प्लसचे फीचर्स फ्लिपकार्ट अॅपमध्ये उपलब्ध होणार नाहीत. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट हेल्थ प्लस अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करावे लागेल. सध्या हे अॅप सुरुवातीच्या टप्प्यात गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकते. तसेच, कंपनी लवकरच ते आयफोनवर डाऊनलोड करण्यासाठी iOS वर उपलब्ध करून देईल.