मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. मात्र या लाटेमुळे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्यानं असंख्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं गेल्या ३ महिन्यांत बंपर भरती केली आहे. मार्च ते मे २०२१ या कालावधीत फ्लिपकार्टनं २३ हजार जणांना नोकरी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत ई-कॉमर्स क्षेत्रातील मागणी वाढल्यानं डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांसाठी भरती करण्यात आल्याची माहिती कंपनीनं दिली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक घरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स सेवांना मोठी मागणी असल्याचं फ्लिपकार्टच्या सप्लाय चेनचे प्रमुख हेमंत बद्री यांनी सांगितलं. ई-कॉमर्स सेवांना असलेल्या मागणीत वाढ झाल्यानं आम्ही सप्लाय चेन वाढवली. त्यामुळे रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध झाल्याचं बद्री म्हणाले.
'कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबतच आम्ही त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचीदेखील काळजी घेत आहोत. सप्लाय चेनमध्ये थेट हायरिंग करण्यासाठी कंपनीकडून प्रशिक्षण कार्यक्रमदेखील राबवण्यात येत आहे. क्लासरुम आणि डिजिटल ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात आहे. यासाठी व्हॉट्स ऍप, झूम आणि हँगआऊटसारख्या मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर करण्यात येत आहे,' अशी माहिती फ्लिपकार्टनं दिली आहे.
'ती' एक बाब पथ्यावर पडली; फ्लिपकार्टकडून बंपर भरती; ३ महिन्यांत २३ हजारांना नोकरी
मार्च ते मे या कालावधीत फ्लिपकार्टकडून २३ हजार जणांना रोजगार; ई-कॉमर्स क्षेत्रामुळे अनेकांना हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:35 PM2021-05-26T16:35:08+5:302021-05-26T16:35:47+5:30