प्रत्येक सणाच्या आधी ई-कॉमर्स वेबसाईट एकापेक्षा एक ऑफर घेऊन येत असतात. पुढचे काही महिने तर त्यांच्यासाठी सुगीचेच आहेत. त्यात अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने 'कार्डलेस क्रेडिट ऑफर'ची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये एकही रुपया खर्च न करता ग्राहकांना ६०,००० रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे. क्रेडिट कार्ड नसलेल्या ग्राहकांना हे कार्डलेस क्रेडिट नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. अॅमेझॉनच्या 'पे ईएमआय क्रेडिट'ला टक्कर देण्याचा हा फ्लिपकार्टचा प्रयत्न आहे.
फ्लिपकार्टच्या साईटवर खरेदी करून चेकआउट करताना ग्राहकांना दोन पर्याय दिले जातील. एक असेल, एका महिन्यानंतर पैसे भरण्याचा, तर दुसऱ्या पर्यायात आपली बिलाची रक्कम ३ ते १२ ईएमआयमध्ये विभागली जाईल. त्यात ग्राहक ६०,००० रुपयांपर्यंतची खरेदी करू शकतो. अर्थात, ग्राहकांनी आधी केलेलं शॉपिंग लक्षात घेऊन हे कर्ज दिलं जाईल. अवघ्या एका मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
'कार्डलेस क्रेडिट'चा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या क्रेडिट लाइनवर साइन-अप करावं लागेल. तिथे आवश्यक ती माहिती भरल्यानंतर इन्स्टंट क्रेडिट दिलं जाईल.
अॅमेझॉन पे ईएमआय फीचरमध्येही ग्राहकांना तात्काळ कर्ज मिळतं आणि ते वापरून आपण ईएमआयवर खरेदी करू शकता. त्यासाठी ग्राहकांना त्यांचं डेबिट कार्ड लिंक करावं लागतं.