नवी दिल्लीः भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट लवकरच मोठा सेल घेऊन येणार आहे. येत्या सणासुदीच्या मोसमाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अत्यंत किफायतशीरदरात आपल्या पसंतीच्या वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी पुन्हा एकदा आपल्या ‘द बिग बिलियन डेज’ या महामेळाव्याची घोषणा केली आहे. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे. सर्वसाधारण ग्राहकांसाठी हा महामेळावा खुला होण्यापूर्वी फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना चार तासांची विशेष वेळ देण्यात येणार आहे. सहा दिवसांच्या या महामेळाव्यात अनेक आघाडीचे ब्रँड्स आपली नवी उत्पादने बाजारपेठेत दाखल करणार असून नवे गेम्स आणि स्पर्धांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी तब्बल १०० कोटींची बक्षिसे आहेत.
यंदाचा बिग बिलियन डेज महामेळावा महानगरांपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या शहरांपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. फ्लिपकार्टच्या ग्राहकांना यंदा प्रथमच या महामेळाव्यादरम्यान खरेदी केल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी विम्याची खरेदीही करता येणार आहे. ग्राहकांसाठी प्रत्येक तासाला विक्रेत्यांकडून नवनव्या आकर्षक ऑफर्स असणार आहेत. तसेच, ग्राहकांसाठी यंदाचा हा महामेळावा अधिक संस्मरणीय व्हावा, यासाठी अमिताभ बच्चन, दीपिका पडुकोण, आलिया भट्ट, विराट कोहली, एम. एस. धोनी, पुनीत राजकुमार, महेश बाबू, दलकीर सलमान यांच्यासारख्या सेलिब्रिटींशी हातमिळवणी केली आहे. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिक सुलभ पद्धतीने खरेदी करता यावी, यासाठी फ्लिपकार्टने ऍक्सिस व आयसीआयसीआय बँकेशी हातमिळवणी केली असून या बँकांच्या कार्डधारकांना विशेष सवलतींचा लाभ होणार आहे. पाच कोटींहून अधिक ग्राहक या महामेळाव्याचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे.
२९ सप्टेंबरपासून फॅशन, टीव्ही आणि अन्य उपकरणे, गृह सजावट, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, क्रीडा, खेळणी, पुस्तके, गॅजेट्स, पर्सनल केअर अप्लायन्सेस, प्रवासाशी संबंधित उत्पादने, तर ३० सप्टेंबर पासून मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व त्यांच्याशी निगडित अन्य साधने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. सहा दिवसांच्या या महामेळाव्यात लाखो विक्रेते, कारागिर आणि ब्रँड्सच्या वतीने विविध श्रेणींमध्ये ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सवलती देण्यात येणार आहेत. कार्डलेस क्रेडिट आणि फ्लिपकार्ट पेलेटर यांपासून ते विविध बँकांच्या डेबिट व क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून शून्य दर मासिक हप्त्यापर्यंत ग्राहकांना वस्तू खरेदीसाठी कर्जाचे विविध पर्यायही उपलब्ध असून ऍक्सिस बँक डेबिट व क्रेडिट कार्ड आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना १० टक्के तात्काळ सवलतीचा लाभ मिळणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कोब्रँड कार्डधारकांना ५ टक्के अतिरिक्त विनामर्याद कॅशबॅकचा लाभही मिळणार आहे. देशभरातील ३० हजार किराणांशीही फ्लिपकार्टने हातमिळवणी केली असून ग्राहकांना याचा लाभ होण्याबरोबरच किराणांच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
फ्लिपकार्टने गेल्या काही वर्षांमध्ये उत्पादनांची श्रेणी व्यापक केली असून अनेक ब्रँड्ससोबत एकत्रितरित्या भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवून उत्पादने तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. आपल्या खासगी ब्रँड्स अंतर्गत २०० श्रेणींमध्ये १० हजारहून अधिक उत्पादने फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत. यावर्षी प्रथमच भारतीय कारागिरी, विणकर आणि कलावंतांना फ्लिपकार्ट समर्थ या उपक्रमाच्या माध्यमातून या महामेळाव्यात सहभागी होता येणार असून त्यांना पहिल्यांदाच आपल्या उत्पादनांची विक्री देशपातळीवरील ग्राहकांना करण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षी फ्लिपकार्टच्या या महामेळाव्याने सणासुदीच्या मौसमाचे बिगुल वाजते. यंदा विविध ब्रँड्ससोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम आकाराचे उद्योजक, विक्रेते आणि कारागिरांच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांसाठी अभूतपूर्व असे वैविध्यपूर्ण पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत, असे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले.