Join us

इंधन दरवाढीमुळे विमानांच्या तिकिटांची दरवाढीची ‘उड्डाणे’; ३०० ते कमाल एक हजार रुपये वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 7:40 AM

विमान इंधनाच्या (एअर टर्बाइन फ्यूअल) किमतीमध्ये १ ऑक्टोबरपासून पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई : विमान इंधनाच्या (एअर टर्बाइन फ्यूअल) किमतीमध्ये १ ऑक्टोबरपासून पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या विमान क्षेत्रात ६० टक्क्यांची सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या इंडिगो विमान कंपनीने आपल्या विमान तिकिटांच्या दरात  प्रवासाच्या अंतरानुसार किमान ३०० ते कमाल एक हजार रुपये वाढ केली आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून लागू झाली आहे.

  आगामी काळात दिवाळी तसेच ख्रिसमसच्या सुट्ट्यासाठी लोक आगाऊ बुकिंग करत असतात. या प्रवाशांना तिकिटासाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर इंडिगोने केलेल्या दरवाढीनंतर देशातील अन्य विमान कंपन्यादेखील अशाच पद्धतीने दरवाढ करण्याचे संकेत मिळत आहे. विमान कंपन्यांच्या एकूण आर्थिक व्यवहारात विमानाच्या इंधनाच्या खर्चाचे प्रमाण ४० टक्के आहे. त्यामुळे हा खर्च वाढला की कंपनीच्या एकूण खर्चात वाढ होते.

२०१८ मध्ये वाढविले होते दर

 दुसरा मुद्दा असा की, विमान इंधनाचा व्यवहार हा अमेरिकी डॉलर या चलनामध्ये होतो. अलीकडच्या काळात भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची किंमत ८३  रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. परिणामी, हे दर कंपनीने वाढविले आहेत. यापूर्वी देखील २०१८ मध्ये कंपनीने वाढविले होते.

रुपयाच्या या घसरणीमुळे आधीच इंधनासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. त्यात १ ऑक्टोबरपासून विमान इंधनात झालेल्या पाच टक्के वाढीमुळे कंपनीच्या खर्चात आणखी वाढ होणार असल्यामुळे अशावेळी विमानांच्या तिकिटांचे दर कमी करणे किंवा स्थिर राखणे याचा परिणाम विमान कंपनीला तोट्याच्या रूपाने होऊ शकतो.

तिकिटांसाठी जास्त पैसे खर्ची पडणार

५४ विमाने ताफ्यात असलेली गो-फर्स्ट कंपनी २ मेपासून जमिनीवर आहेत. त्यातच अकासा विमान कंपनीच्या ४३ वैमानिकांनी नोकरी सोडल्यामुळे कंपनीने १० मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कपात केली आहे तर, ८ मार्गांवरील सेवा बंद केली आहे. त्यामुळे एकूण विमाने व विमान फेऱ्या यामध्ये कपात झाली.

आगामी काळात असलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोक मोठ्या प्रमाणावर विमानाने प्रवास करतील. पण अशावेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे तिकिटांचे दर आणखी भडकण्याचे संकेत मिळत आहेत.

अशी आहे दरवाढ (आकडे रूपयांत)

              अंतर                  दरवाढ

              ० ते ५०० किमी  ३००

              ५०० ते १००० किमी      ४००

              १००१ ते १५०० किमी     ५५०

              १५०१ ते २५०० किमी     ६५०

              २५०१ ते ३५०० किमी     ८००

              ३५०१ किमी व त्यापुढे    १०००

प्रवासाच्या अंतरानुसार कंपनीने नवे वाढीव दर जाहीर केले.