Nirmala Sitharaman, 2000 rupees notes: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी 2,000 रुपयांची नोट चलन प्रक्रियेतून बाद करण्याच्या निर्णयावर महत्त्वाचे विधान केले. हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला असून, पी चिदंबरम यांनी केलेली टीका योग्य नाही. एखाद्या गोष्टीचा आपल्याला अंदाज येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे इतक्या लवकर प्रतिक्रिया देण्याची घाई करणे बरोबर नाही, असे त्या म्हणाल्या. त्यासोबत, २०००च्या नोटेबाबत बोलताना, RBIला जे मिळवायचं होतं ते त्यांनी नक्कीच मिळवलं आहे त्यामुळे विरोधकांना जे बोलायचे आहे ते बोलू दे, असा दमदार टोला त्यांनी लगावला.
चिदंबरम यांनी 2,000 रुपयांची नोट परत मागवण्याच्या आरबीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.“हा अविचारी निर्णय आहे, काही जण याला मूर्खही म्हणतील - 2,000 रुपयांच्या नोटेचा वापर फारसा झालाच नाही. तितक्यात नोट मागे घेण्याच्या निर्णयामुळे आता भयंकर धावपळ होईल आणि चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण होईल,” असे चिदंबरम म्हणाले होते. त्यांना उत्तर देताना सीतारामन यांनी सुनावले.
“2,000 रुपयांच्या नोटेबाबतचा निर्णय आरबीआयने विविध पैलूंचा विचार करून घेतला आहे. मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या चलन निर्णयासारख्या विषयावर आक्षेप घेणे आणि इतर देशांशी तुलना करणे चुकीचे होते. मंत्रालयात 10 वर्षे सेवा केलेल्या माजी अर्थमंत्र्यांसाठी, RBI च्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे किंवा आक्षेप घेणे हे देशासाठी चांगले नाही. 10 वर्षे सरकारमध्ये ते अर्थमंत्री असताना आम्ही संसदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्याकडून आम्हाला ठोस किंवा समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आरबीआय क्लीन नोट धोरण लागू करत आहे, ज्यामुळे अनेक नोटा परत आल्या तर काही अजूनही सिस्टमच्या बाहेर आहेत. आरबीआयला या नोटांबाबत जे काही हेतू साध्य करायचा होता, तो हेतू साध्य झाला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी कितीही आरडाओरड केली तरी त्याचा फारसा अर्थ नाही," असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.