या सप्ताहामध्ये जाहीर होणारे चलनवाढीचे आकडे, कंपन्यांचे तिमाही निकाल यावर बाजाराची नजर राहणार असून एकूण या सप्ताहात बाजारात चढ उतार जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधपणे व्यवहार करणे जरुरीचे आहे.
याशिवाय परकीय वित्तसंस्थांची कामगिरी, डॉलरचे आणि खनिज तेलाचे दर याचाही प्रभाव बाजारावर पडणार आहे. या सप्ताहामध्ये देशातील चलनवाढीचे आकडे जाहीर केले जाणार आहेत. त्याआधी गतसप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेले देशाच्या औद्योगिक उत्पादनाचे आकडे हे चांगले संकेत दर्शवित आहेत.
...तर मूड बदलणार?
चलनवाढीच्या दरानुसार बाजाराचा मूड बदलू शकेल. या सप्ताहामध्ये अनेक महत्वाच्या कांपन्यांचे निमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यात इन्फोसिस, रिलायन्स, एचसीएल, एचडीएफसी, ॲक्सिस बँक या कंपन्यांचा समावेश आहे. nयाआधी जाहीर झालेले कंपन्यांचे निमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे न आल्याने बाजारावर विक्रीचे दडपण येऊन निर्देशांक खाली आले.
परकीय वित्तसंस्थांनी काढले २२,००० कोटी
डिसेंबर महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये १५,४४६ कोटी रुपये गुंतविले होते. त्यानंतर मात्र या संस्थांनी विक्रीचा धडाका लावलेला दिसून येतो. जानेवारी महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी २२१९४ कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. यामुळे बाजारात नकारात्मक प्रभाव पडला.
अमेरिकेमधील बॉण्डसवरील वाढलेला परतावा, कंपन्यांचे काही प्रमाणात कमी आलेले तिमाही निकाल, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा मंदावलेला वेग ही अन्य कारणेही यासाठी आहेत. या सप्ताहात या संस्थांचे धोरण कसे राहणार यावर बाजाराची वाढ ठरणार आहे.
रुपयालाही फटका
गतसप्ताहामध्ये डॉलर मजबूत झाल्याने त्याचा फटका रुपयाला बसल्याने बाजाराला घसरण सहन करावी लागली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढल्याने उद्योगांवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती आहे. संस्थांनी भारतामध्ये विक्री करीत पैसा अमेरिकेमध्ये गुंतविला आहे.
या सप्ताहात अमेरिकेतील बेरोजगारीचा दर जाहीर होणार असून त्याचाही परिणाम बाजारावर होईल. नियोजित अध्यक्षांची अर्थव्यवस्तेवर निर्बंध आणण्याची घोषणाही बाजाराला सावधगिरीचा इशारा देते का ते या बघावे लागेल.