गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या बरेच चढ-उतार दिसून येत आहेत. अशात असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिलाय. झोमॅटोच्या शेअर्सने अस्थिर बाजारातही नवीन उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी सुमारे 3% वाढीसह Zomato चे शेअर्स 191.90 रुपयांवर पोहोचले. फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्सचा हा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. या वर्षी आतापर्यंत झोमॅटोचे शेअर्स सुमारे 55 टक्क्यांनी वाढले आहेत. झोमॅटोचा आयपीओ 76 रुपयांना आला होता आणि आता कंपनीचे शेअर्स 190 रुपयांच्या पुढे गेले आहेत. झोमॅटोच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 51.30 रुपये आहे.
वर्षभरात 271% टक्क्यांची तेजी
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 271% वाढ झाली. 5 एप्रिल 2023 रोजी झोमॅटोचे शेअर्स 51.75 रुपयांवर बंद झाले. 5 एप्रिल 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 191.90 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत झोमॅटोच्या शेअर्समध्ये सुमारे 83% वाढ झाली. तर 5 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 105.45 रुपयांवर होते, जे आता 190 रुपयांच्या पुढे गेले आहेत. गेल्या एका महिन्यात झोमॅटोच्या शेअर्समध्ये 15% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने झोमॅटोवर बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं आता झोमॅटो शेअर्ससाठी 210 रुपयांचं टार्गेट दिलं आहे. कोटकनं यापूर्वी झोमॅटो शेअर्ससाठी 190 रुपयांचं टार्गेट दिलं होते. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनुसार मार्च 2024 च्या तिमाहीत झोमॅटोच्या कामगिरीमध्ये चांगली ताकद दिसून येईल. झोमॅटो नजीकच्या भविष्यात बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी चांगल्या स्थितीत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)