Join us  

गेल्या दोन वर्षांत मसाल्यांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या; तांदूळ 32 टक्के तर डिटर्जंट 9.7 टक्क्यांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:57 AM

Food Inflation : पांढरा हिंग मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचे म्हटले जाते. हा पाण्यात विरघळणारा आहे. तर इतर देशांत आढळणारी लाल हिंग तेलात विरघळणारा असतो.

नवी दिल्ली : हिंगाच्या दरात वाढ झाल्यानंतर मसाल्यांच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अफगाणिस्तान व्यतिरिक्त भारत इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांकडूनही हिंग खरेदी करतो. भारतात वापरल्या जाणार्‍या हिंगाच्या दोन सर्वात सामान्य प्रकार म्हणजे लाल आणि पांढरा. पांढरा हिंग मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचे म्हटले जाते. हा पाण्यात विरघळणारा आहे. तर इतर देशांत आढळणारी लाल हिंग तेलात विरघळणारा असतो.

गेल्या वर्षी ऑगस्ट ते या वर्षी जून या कालावधीत अफगाणिस्तानातून भारतात होणाऱ्या आयातीत दर महिन्याला फरक पडला आहे. उद्योगाच्या अंदाजानुसार, भारताने यावर्षी जूनमध्ये हिंग घेण्यासाठी 17.6 मिलियन डॉलर खर्च केले. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या किमतीत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बर्‍याच मसाल्यांच्या किमती वर्षानुवर्षे दुहेरी अंकी वाढल्या आहेत. ब्रँडेड कोथिंबिरीच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये 16.9 टक्क्यांनी वाढल्या आहेत. रिटेल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म बिजोमने दिलेल्या माहितीनुसार, गरम मसाला देखील 15.6 टक्क्यांनी महाग झाला आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही गेल्या वर्षभरात माफक प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रँडेड दूध 5.4 टक्के आणि ब्रेड 12.3 टक्क्यांनी महागले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमूल आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली होती. ICICI सिक्युरिटीजच्या नोटनुसार, या वर्षी जुलैमध्ये संपूर्ण भारतात घाऊक दुधाच्या किमती वार्षिक 6 टक्क्यांनी वाढल्या आहेत. लोणी, तूप, बासमती तांदळाचे भावही वाढत आहेत. ब्रँडेड बासमती तांदळाच्या किमतीत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. लोणी ७.७ टक्क्यांनी, तर तूप 5.3 टक्क्यांनी महागले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ब्रँडेड आंघोळीचा साबण 15 टक्के महाग झाला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स सारख्या एफएमसीजी कंपन्यांनी साबणांच्या किमती वाढवल्या आहेत. ब्रँडेड डिटर्जंटच्या किमतीही गेल्या वर्षभरात 9.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिझोमच्या आकडेवारीनुसार, फ्लोअर क्लीनिंग उत्पादने 12.3  टक्क्यांनी महाग झाली आहेत.

टॅग्स :व्यवसाय