- शरद गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थ, गहू, सोयाबीन, रासायनिक उर्वरके, तांबे, पोलाद आणि ॲल्युमिनियम यांच्या किमती वाढल्या आहेत. याचाच लाभ घेत व्यापाऱ्यांनी पुरेसा साठा असतानाही या वस्तू चढ्या दराने विकण्यास सुरुवात केली आहे.
गव्हाच्या किमतीत २०% वाढ झाल्याने गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील गहू आता प्रतिक्विंटल २४०० ते २४५० रुपये दराने निर्यात केला जात आहे. सरकारी गोदामांमध्ये पुरेसा धान्यसाठा उपलब्ध असल्याने तूर्तास तरी गव्हाच्या किमती वाढण्याची शक्यता नाही, असे कृषी आणि खाद्यान्न तज्ज्ञ देवेंद्र शर्मा यांनी स्पष्ट केले. खाद्यतेलाच्या किमती मात्र भरमसाठ वाढल्या आहेत. सहा महिने पुरेल एवढा खाद्यतेलाचा साठा असूनही किमती वाढवल्या जात आहेत. युरिया, डाय-अमोनियम फॉस्फेट यांसारख्या उर्वरकांच्या किमती जागतिक बाजारात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम शेतीवर होणार असून खाण्यापिण्याचे पदार्थ महाग होणार आहेत.
हे महाग होणार
n निकेल धातूच्या किमती
१५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने मुलाम्याचे अलंकार, दागिन्यांचे धातुकाम, रासायनिक उपकरणे, सागरी उपकरणातील जोडभाग तयार करणे महाग होणार आहे.
n युद्धामुळे रशियाने जहाजामार्गे होणारी निर्यात बंद केल्याने गहू महाग होणार आहे.
n रशिया युरोपला ४० टक्के गॅस पुरवठा करतो. रशियावरील निर्बंधामुळे जगभरात गॅसची टंचाई निर्माण होण्याची
शक्यता आहे.
n तांब्याच्या किमतीही आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असून, विद्युत जनित्रे
व चलित्रे (मोटारी), विद्युत संवाहक तारा, केबल, गज, मोटारगाडीतील उपकरणे, दारूगोळा, रेडिओ, दूरचित्रवाणी, घड्याळे, विविध प्रकारची भांडी महाग होण्याची शक्यता आहेत.