Join us

अन्नधान्य उत्पादन ३ लाख टनाने होणार कमी, पावसाच्या विलंबाचा परिणाम, तांदूळ आणि डाळींखालील क्षेत्रात घट झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:11 AM

देशाच्या अनेक भागांतील पूर आणि काही भागांतील पावसाचा अभाव यामुळे यंदाच्या खरीप हंगामात अन्नधान्याचे उत्पादन ३.५ दशलक्ष टनाने म्हणजेच २.५ टक्क्यांनी घसरून १३५ दशलक्ष टनावर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागांतील पूर आणि काही भागांतील पावसाचा अभाव यामुळे यंदाच्या खरीप हंगामात अन्नधान्याचे उत्पादन ३.५ दशलक्ष टनाने म्हणजेच २.५ टक्क्यांनी घसरून १३५ दशलक्ष टनावर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सन २०१६-१७ या पीक वर्षाच्या (जुलै ते जून) खरीप हंगामात १३८.५२ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. चांगल्या पावसामुळे उत्पादनात वाढ झाली होती.यंदाच्या खरीप हंगामात अन्नधान्यांचे एकूण उत्पादन (तांदूळ, डाळी आणि भरडधान्ये मिळून) १३५ दशलक्ष टन होईल, असा अंदाज आहे. खरीप हंगामातील पिकांची लागवड साधारणत: जुलैमध्ये सुरू होऊन काढणी आॅक्टोबरपासून सुरू होते. यंदा तांदूळ आणि डाळींखालील क्षेत्रात घट झाली आहे. कमजोर पाऊस आणि घसरलेल्या किमती ही यामागील मुख्य कारणे आहेत. तांदळाचे उत्पादन घसरून ९५ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ते ९६.३९ दशलक्ष टन होते. डाळी आणि भरडधान्याच्या उत्पादनातही घट होईल. सूत्रांनी सांगितले की, हा प्राथमिक आढावा आहे. त्यात नंतर सुधारणा केली जाऊ शकते. पूरग्रस्त भागात शेतक-यांनी उशिरा पेरण्या केलेल्या असू शकतात. जून-जुलै कोरडा गेलेल्या कर्नाटकसारख्या राज्यांत पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. ८ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाताची लागवड ३७१.४६ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी ती ३७६.८९ हेक्टरवर होती. डाळींची पेरणी १३९.१७ लाख हेक्टरवर झाली. गेल्या वर्षी हा आकडा १४४.८४ लाख हेक्टर इतका होता. भरडधान्याची पेरणी १८६.०६ लाख हेक्टरवरून १८३.४३ लाख हेक्टरवर घसरली आहे.>काही राज्यांत पाऊ सच नाहीकर्नाटकचे नैसर्गिक आपत्ती संनियंत्रण केंद्राचे संचालक जी. एस. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, जून आणि जुलै या महत्त्वपूर्ण महिन्यांत पावसाअभावी पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा राज्यात खरिपाच्या पिकाखालील क्षेत्रात २५ टक्के घसरण अपेक्षित आहे.यंदा आसाम, बिहार, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत पूर आला होता. याउलट कर्नाटक, छत्तीसगड, तामिळनाडू या राज्यांत पाऊसच पडला नाही.