- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नवी दिल्ली : जीएसटीमुळे सोन्याचे दागिने आणि सोने महाग होणार आहे; पण एक हजार रुपयांपर्यंतचे कपडे स्वस्त होतील. सामान्य माणसाच्या वापराच्या चपला, बूट स्वस्त होतील. परिषदेच्या बैठकीत पॅकिंगच्या बँ्रडेड खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी कर लावला जाईल. विड्यांवर २८ टक्के जीएसटी लागेल.
विड्या बनवण्यात येणाऱ्या तेंदू पानाच्या विक्रीवर १८ टक्के कर लागेल. विडीवर सिगारेटसारखा उपकर नसेल. बिस्किटावर १८ टक्के कर लागेल. ५०० रुपये किमतीच्या पादत्राणांवर ५ टक्के कर लागेल, तर त्यापेक्षा जास्त किमतीच्या पादत्राणांवर १८ टक्के कर आकारणी होईल. रेशमी आणि पटसन फायबरला जीएसटीपासून दूर ठेवण्यात आले आहे. कापूस आणि नैसर्गिक आणि सगळ्या प्रकारच्या धाग्यांवर पाच टक्के कर लागेल. मानवनिर्मित फायबर आणि धागा १८ टक्क्यांच्या श्रेणीत असेल. सगळ्या प्रकारच्या कपड्यांवर पाच टक्के जीएसटी लागेल.
अन्नधान्य वगळले, वीजेसह तेल, साबण, टुथपेस्ट स्वस्त होणार
अन्नधान्य विशेष करून गहू आणि तांदळाच्या किंमतींना जीएसटीतून वगळण्यात आले. सध्या काही राज्ये त्यांच्यावर मुल्यवर्धित कर आकारतात. केशतेल, साबण व टुथपेस्टसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू आणि वीज यांचे दर १ जुलैपासून कमी होतील.
एक हजार रुपयांपर्यंतच्या मानवनिर्मित कपड्यांवर पाच टक्क्यांच्या निम्न दराने कर लागेल. सध्या त्यावर सात टक्क्यांनी कर लागतो. एक हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर १२ टक्के कर लागेल. कपडे आणि पादत्राणांबाबत सवलत दिल्याचे जेटली म्हणाले.