Business : ‘प्रधानमंत्री - सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॉट क्षमतेच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी केंद्राकडून कुटुंबाला ७८ हजार रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. छतावर रूफटॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे.
किलोवॉटला तीस हजार रुपये अनुदान :
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते; अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येणार आहे. केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार रूफटॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
१) एक किलोवॉट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते.
२) महिना दीडशे युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे.
नव्या दराने अनुदान मिळणार :
१३ फेब्रुवारीनंतर रूफटॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत राज्यात रूफटॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १,२७,६४६ असून, त्यांची वीजनिर्मिती क्षमता १९०७ मेगावॉट झाली आहे.
दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीजवापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.
अधिक एक किलोवॉट म्हणजे तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॉटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. अर्थात, एक किलोवॉटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल.
केंद्र सरकारची सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी योजना :
वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रतिग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित आहे.