रोखीच्या टंचाईचा सामना करत असलेली एडटेक कंपनी बायजूसनं पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला विलंब केला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्यात आले आहेत. राईट्स इश्यूद्वारे उभारलेली रक्कम जारी करण्यासाठी सध्या एनसीएलटीकडून मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहे, ज्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात अडचणी येत आहेत. गेल्या महिन्यातही बायजूसचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी असाच युक्तिवाद केला होता.
कंपनीनं १ एप्रिल रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. 'आम्हाला कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की, तुमचा पगार मिळण्यास पुन्हा एकदा विलंब होणार आहे. आमचा भारताच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आमच्या बाजूनं निकाल येण्याची वाट पाहत आहोत आणि राईट्स इश्यूद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर करून आम्ही रोखीच्या तुटवड्याचा सामना करू शकतो,' असं कंपनीनं पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय.
'आम्ही अन्य मार्गाने कर्ज घेण्याची तयारी करत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा पगार ८एप्रिलपर्यंत मिळू शकेल. राईट्स इश्यूवरून उभारलेल्या निधीवरून बंदी उठवल्यानंतर आम्ही पगाराशी संबंधित सर्व आश्वासनं पूर्ण करू शकू,' असंही त्यात नमूद केलंय.
कर्मचाऱ्यांना दिलं वर्क फ्रॉम होम
बायजूसनं काही काळापूर्वी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं होतं. रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या कंपनीनं देशभरातील ऑफिसेस रिकामी केली आहेत. कंपनीनं केवळ बेंगळुरूमधील मुख्यालय सुरू ठेवलं आहे.
गेल्या महिन्यातही वेतन नाही
बायजू रवींद्रन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. राईट्स इश्यू यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. अजूनही तुमचा पगार देण्यावर प्रक्रिया करू शकणार नाही, हे सांगताना खेद वाटतोय. गेल्या महिन्यात भांडवलाच्या कमतरतेमुळे आम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला आणि निधी असूनही आम्हाला विलंब होत आहे, असं बायजू रवींद्रन म्हणाले होते.