फोर्ब्सची सर्वात श्रीमंत भारतीयांची २०२१ ची यादी (Forbes india rich list 2021) जाहीर करण्यात आली आहे. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Reliance Industries Mukesh Ambani) हे सलग चौदाव्या वर्षी या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. २००८ पासून ते या स्थानी कायम आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. फोर्ब्सनुसार (Forbes) कोरोना महासाथीच्या दुसऱ्या वर्षात (Coronavirus Pandemic) भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्ती ५० टक्क्यांची वाढ झाली.
गौतम अदानी (Gautam Adani) हे ७४.८ बिलियन डॉलर्सच्य संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा ते १७,९ बिलयन डॉलर्सनं मागे आहेत. तर दुसरीकडे सावित्री जिंदल (Savitri Jindal) १८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पुन्हा टॉप १० मध्ये सामील झाल्या आहेत. तर चार फार्मा कंपन्यांशी निगडीत असलेल्या अब्जाधीशांच्या संपत्ती घट झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत १०० जणांची संपत्ती मिळून ७७५ अब्ज डॉलर्स आहे.
अदानी दुसऱ्या स्थानी
गौतम अदानी हे सलग तिसऱ्या वर्षी दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. अदानी यांच्या संपत्तीत वाढ शेअर बाजारातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे झाली आहे. त्यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ होऊन ती २५.२ अब्ज डॉलर्स वरून ७४.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक (HCL Technologies) शिव नाडर ३१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत १०.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. रिटेलिंग सेक्टरमधील व्यावसायिक राधाकृष्ण दमानी हे चौथ्या स्थानी कायम आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५.४ अब्ज डॉलर्सवरून दुपटीनं वाढून २९.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. "व्ही शेप रिकव्हरीमुळे शेअर बाजारात उत्साह वाढला आहे. यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत लोकं अधिक मोठ्या उंचीवर पोहोचली आहेत," अशी प्रतिक्रिया फोर्ब्स आशिया वेल्थ एडिटर आणि इंडिया एडिटर नाजनीन करमाली यांनी दिली.
नव्या चेहऱ्यांचाही समावेश
यावर्षी या यादीत सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये ९३ व्या क्रमांकावर अशोक बूब, दीपक नायट्राईटचे दीपक मेहता ९७ व्या क्रमांकावर, अल्काइल एमाइन केमिकल्सचे योगेश कोठारी १०० व्या क्रमांकावर आहे. डॉ. लाल पॅथलॅब्सचे कार्यकारी अध्यक्ष अरविंद लाल यांना या यादीत ८७ व्या क्रमांका देण्यात आला आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेते मंगलप्रभात लोढा हे ४२ व्या आणि अपोलो हॉस्पीटल एन्टरप्राईजचे प्रताप रेड्डी हे ८८ व्या क्रमांकावर आहेत.
या यादीत सावित्री जिंदाल या ७ व्या, हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता यांना यादीत २४ वं स्थान देण्यात आलं आहे. तर बायजूसच्या सहसंस्थापक दिव्या गोकुळनाथ यांना ४७ वं, बायोकॉनच्या किरण मुझुमदार शॉ या पाचव्या आणि मल्लिका श्रीनिवासन यांना ७३ वं स्थान देण्यात आलं आहे.