Gautam Adani Brother: भारतातील दिग्गज उद्योगपती आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी यावर्षीही फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत (Forbes List) स्थान मिळवले आहे. गौतम अदानी $84 अब्ज पेक्षा जास्त संपत्तीसह यादीत 17व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, गौतम यांच्याशिवाय त्यांचे भाऊ विनोद अदानी (Vinod Adani) यांचाही फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 24.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह विनोद अदानी 84व्या क्रमांकावर आहे.
काय करतात विनोद अदानी?
विनोद अदानी यांनी 1976 मध्ये मुंबईतील पॉवरलूममधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिंगापूरमध्ये कार्यालय उघडले. त्यानंतर दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, नंतर त्यांनी सायप्रसचे नागरिकत्व घेतले. सध्या विनोद अदानी यांच्याकडे ACC आणि अंबुजा सिमेंटची मालकी आहे. फोर्ब्सच्या यादीत 84व्या क्रमांकावर असलेले विनोद अदानी यांची संपत्ती 24.2 अब्ज डॉलर्स (2,01,912 कोटी रुपये) आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये विनोद अदानी यांचेही नाव
गौतम अदानी नेहमी चर्चेत असातात, पण त्यांचे मोठा बंधू विनोद अदानी यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. मात्र, 2023 च्या हिंडेनबर्ग अहवालात विनोद अदानी यांचे नाव आले होते. विनोद अदानी आंतरराष्ट्रीय बाजारातून अदानी समूहासाठी निधी गोळा करत असल्याचा आरोप रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. याशिवाय त्यांनी शेल कंपन्यांचे जाळे उभारले, याद्वारे फेरफार, मनी लाँड्रिंग अशाप्रकारचे आरोपही त्यांच्यावर होते. मात्र, यातील एकही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही.