Join us

मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचे स्थान घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 7:50 AM

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील 9 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Man in Asia) बनले आहेत. 'फोर्ब्स'ने मंगळवारी जारी केलेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली. मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील 9 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. 

गौतम अदानी 47.2 अब्ज डॉलर्स संपत्तीसह श्रीमंतांच्या जागतिक यादीत 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे. फोर्ब्सच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, 24 जानेवारी 2023 पर्यंत 126 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेले अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण, अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्याच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली. दरम्यान, ते मुकेश अंबानींनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. 

विशेष बाब म्हणजे, यावेळी श्रीमंतांच्या या यादीत 169 भारतीय अब्जाधीशांनी स्थान मिळवले आहे. 2022 मध्ये ही संख्या 166 होती. मात्र, या संख्येत वाढ होऊनही या श्रीमंतांची संपत्ती 10 टक्क्यांनी घटून 675 अब्ज डॉलर्स झाली आहे. 2022 मध्ये त्यांची संपत्ती 750 डॉलर्स अब्ज होती. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) गेल्या वर्षी 100 अब्ज डॉलरहून अधिक कमाई करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे.

फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत एका वर्षात 200 अब्ज डॉलरची घट झाली आहे. 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 2,300 अब्ज डॉलर्स होती, जी आता घट होऊन 2,100 अब्ज डॉलर्सपर्यंत आली आहे. दरम्यान, अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत सर्वाधिक 57 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका वर्षात 39 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट 211 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इलॉन मस्क दुसऱ्या स्थानवर असून त्यांची संपत्ती 180 अब्ज डॉलर्स आहे. तर जेफ बेझोस (114 अब्ज डॉलर्स) तिसऱ्या, लॅरी एलिसन (107 अब्ज डॉलर्स) चौथ्या आणि वॉरेन बफे (106 अब्ज डॉलर्स) पाचव्या स्थानावर आहेत. याशिवाय, बिल गेट्स 104 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत. मायकेल ब्लूमबर्ग सातव्या, कार्लसन स्लिम हेलू आठव्या, मुकेश अंबानी नवव्या आणि स्टीव्ह बाल्मर दहाव्या स्थानावर आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीगौतम अदानीरिलायन्सव्यवसायएलन रीव्ह मस्क