नवी दिल्ली : कर चुकवल्याप्रकरणी जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाने (डीजीजीआय) १० परदेशी विमान कंपन्यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. डीजीजीआयचा आरोप आहे की, परदेशात मुख्यालय असलेल्या कंपन्यांची कार्यालये भारतात आहेत. या कार्यालयांना प्रवासी व मालवाहू भाड्यांशी संबंधित परकीय चलन पाठविण्यास परवानगी दिली आहे. मुख्य कार्यालयांद्वारे भाडे, विमान देखभाल, क्रूचे पगार आदी सेवा दिल्या जातात. विदेशातून या सेवा दिल्या जात असल्या तरी रिव्हर्स चार्ज सिस्टिममुळे जीएसटीअंतर्गत येतात. मात्र यावर विमान कंपन्यांनी जीएसटी भरलेला नाही. (वृत्तसंस्था)
उत्तरासाठी वेळ हवा
डीजीजीआय मेरठ आणि मुंबई झोनकडून या सर्व एअरलाइन्सची ऑक्टोबर २०२३ पासून चौकशी करण्यात येत आहे. काही कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये तपासणी सुरू आहे. या कंपन्यांच्या भारतीय कार्यालयाकडून डीजीजीआयकडे अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यासाठी कंपन्यांनी अधिक वेळ मागितला आहे.