खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी असलेली येस बँक आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. येस बँकेतील हिस्सा खरेदी करण्यासाठी जगातील अनेक बँका आणि कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याची माहिती समोर आलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम आशिया आणि जपानमधील अनेक बँकांनी येस बँकेतील ५१% हिस्सा खरेदीसाठी स्वारस्य दाखवलं आहे. तसंच अनेक पीई कंपन्यांचंही याकडे लक्ष लागलं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही डील ८ ते ९.५ अब्ज डॉलर्सची असू शकते. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून ५१ टक्के हिस्सा विकण्यास तत्त्वत: मान्यता मिळालेली नाही, असं बँकेचं म्हणणे आहे. येस बँकेत एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँकेचा ३३.७४ टक्के हिस्सा आहे. बँकेत एसबीआयचा सर्वाधिक हिस्सा २३.९९ टक्के आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्स्ट अबू धाबी बँक पीजेएससी, मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप येस बँकेतील ५१.६९ टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. तसंच काही पीई कंपन्यांनी यात रस दाखविला आहे. बँकेत एफडीआयचा हिस्सा १७.९५ टक्के आणि एफपीआयचा १०.२८ टक्के आहे. देशांतर्गत बँकांना येस बँकेतील आपला हिस्सा विकायचा आहे. ५ मार्च २०२० रोजी आरबीआयनं येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं. त्यानंतर भारतीय बँकांनी ते वाचवण्यासाठी १० हजार कोटी रुपये ओतले. यात एसबीआयचा हिस्सा ६,०५० कोटी रुपये होता.
शेअर्समध्ये तेजी
एसबीआयला येस बँकेत ४८.२ टक्के हिस्सा मिळाला. पण गेल्या चार वर्षांत हळूहळू बँकेतील आपला हिस्सा कमी केला आहे. दरम्यान, जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने येस बँकेचा दृष्टीकोन स्टेबलवरून पॉझिटिव्ह केला आहे. त्यामुळे आज बँकेच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. कामकाजादरम्यान शेअर २६.५८ रुपयांवर ट्रेड करत होता. तर दुसरीकडे त्याची इंट्रा डे उच्चांकी पातळी २७.०८ रुपये होती. या वर्षी बँकेचे समभाग १६ टक्क्यांनी वधारले असून, बँकेचं मूल्यांकन ९.४ अब्ज डॉलर झाले आहे. शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३२.८१ रुपये आहे. ९ फेब्रुवारी रोजी बँकेचा शेअर या पातळीवर पोहोचला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)