मुंबई : बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातून मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ भरती करीत असतात. परंतु, आता आयटी क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील मनुष्यबळाची भरतीही या कंपन्यांनी सुरू केली आहे.
रँडस्टँड इंडियाचे प्रमुख (शोध व निवड) संजय शेट्टी यांनी सांगितले की, रँडस्टँडच्या अन्य परिचालन कंपन्यांनी भारतीय मनुष्यबळात रस दाखविला आहे. भारतात केवळ संपर्क अधिकारी असलेल्या अनेक कंपन्या भारतीय लोकांची भरती करून त्यांना उच्च पदावर नेमणुका देत आहेत. पोर्तुगाल, स्पेन, बल्गेरिया, बेल्जियम आणि सिंगापूर यांसारख्या अनेक देशांतील अशा कंपन्या भारतीयांची भरती करीत आहेत. या कंपन्यांचे भारतातील कामकाज सुरू होईपर्यंत हे लोक रँडस्टँडचे कर्मचारी असतात. कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांना कंपन्यांकडे हस्तांतरित केले जाते.
टिमलीज सर्व्हिसेसचे सहसंस्थापक ऋतुपर्ण चक्रवर्ती यांनी सांगितले की, भारतातील अधिग्रहण व्यावसायिकांना विदेशातून मोठी मागणी आहे. यातील सर्वांत मोठी मागणी पश्चिम आशियातून आहे. युरोप आणि अमेरिकेतूनही आमच्याकडे चौकशी होत आहे.
- रोजगार क्षेत्रातील संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतातून डिजिटल मार्केटिंग, कंटेंट, डिझाइन, लेखा, प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि वस्तू उत्पादन इत्यादी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ भरती करीत आहेत. भारतीय मनुष्यबळास प्राधान्य देण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांना दोन फायदे आहेत. एक म्हणजे येथील मनुष्यबळ कुशल असते आणि दुसरे म्हणजे त्यांचे इंग्रजी उत्तम असते.