भारताचा जीडीपी सध्या जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात मजबूत आहे. हे लक्षात घेऊन विदेशी रेटिंग फर्म बार्कलेजनं भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज १.१० टक्क्यांनी वाढवून ७.८ टक्के केला आहे. रेटिंग फर्मनं जीडीपीच्या अंदाजात वाढ अशा वेळी केली आहे जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या जीडीपी वृद्धी दराच्या आकडेवारीनुसार ८.४ टक्के दराने वाढली आहे. हा अंदाज ६.५ टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे.
बार्कलेजचे ईएम एशिया इकॉनॉमिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख राहुल बाजोरिया यांनी २९ फेब्रुवारी रोजी उशिरा एक नोट जारी केली. आजचा डेटा आणि अर्थव्यवस्थेचा वेग लक्षात घेऊन आम्ही २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज वाढवत असून तो ७.८ टक्के करत आहोत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीपासून तिसऱ्या तिमाहीपर्यंत विकास दराचा सरासरी वेग ८.२ टक्के राहिला आहे.
२०२४-२५ साठी अंदाजात वाढ
अर्थव्यवस्थेचा वेग पाहता, आम्ही येत्या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०२४-२५ साठी विकास दराचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत. सरकार करत असलेल्या भांडवली खर्चाचा अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे आणि यामुळे तेजी कायम आहे, असं ते म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतासाठी ६.७ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या तिमाहीत धीम्या गतीनं वाढ होऊनही, भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था चीन (४.६%), अमेरिका (२.१%), जपान (०.९%), फ्रान्स (१%), युनायटेड किंगडम (०.६%) आणि जर्मनी (-०.५%) यांसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा उत्तम कामगिरी करेल. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.