- अरुण फिरोदिया
कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात केल्याने परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. त्याचे परिणाम येत्या दीड-दोन वर्षांत दिसू लागतील. आपला करांचा दर शेजारील थायलंड, व्हिएतनाम आदी देशांपेक्षा खूप जास्त होता. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार इथे गुंतवणूक करीत नव्हते. या सुधारणांमुळे करांचा दर हा इतर देशांच्या बरोबरीने झाला आहे. यामुळे परदेशी गुंतवणूक येण्यास सुरुवात होईल. परिणाम यायला मात्र वेळ लागेल.
सरकारने उद्योगांसाठी व अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी आजपर्यंत राबविलेल्या सर्वांत प्रभावी उपायाची आज घोषणा झाली. तब्बल दीड लाख कोटींची तूट सोसून सरकारने हे पाऊल उचलले आहे. आता प्रश्न आहे की ही तूट भरून कशी काढायची? यासाठी तोट्यात चाललेले सरकारी उद्योग विकून टाकायची गरज आहे. तरच या सुधारणांचा उपयोग होईल. आजच्या निर्णयामुळे शेअरबाजारात तेजी आली आहे. कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्यावर शेअर वधारतात. करांचा दर कमी झाल्याने नफा वाढणार आहे. मात्र, गुंतवणूक वाढली तरच जीडीपी वाढण्यास मदत होणार आहे.
त्यामुळेच, एवढ्यावरच थांबून चालणार नाही. सध्या मंदीसदृश्य वातावरण दिसत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागांत कमी झालेली मागणी. मोटारी किंवा दुचाकीचे शहरी भागातील मार्केट सॅच्युरेट झाले आहे. रस्ते, पार्किंगचा प्रश्न यांमुळे शहरी भागांतील मागणी कमी झाली आहे. खरी मागणी ही ग्रामीण भागांतून होते. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागांतील उद्योगांना जास्तीतजास्त सवलती देणे गरचेचे आहे.
>खरी मागणी ही ग्रामीण भागातूनच होत असते. हे ओळखून ग्रामीण भागांत उद्योगांना जास्त दराने कर्ज घ्यावे लागते. सरकारी बॅँकांनी ग्रामीण भागांतील उद्योगांना स्वस्त आणि सुलभ कर्ज द्यायला हवे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील शहरांमध्ये भरभराट झाली तर आपोआपच त्याचा परिणाम शहरी बाजारपेठेवर होईल. मागणी वाढेल. ग्रामीण भागात उद्योगांना चालना मिळाली, सुबत्ता आली तरच देशाची अर्थव्यवस्था गतिमान होईल.
(अध्यक्ष, कायनेटिक समूह)
परदेशी गुंतवणूक वाढीला चालना, मात्र परिणाम वर्षभरानंतर
कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात केल्याने परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 03:54 AM2019-09-21T03:54:50+5:302019-09-21T03:54:57+5:30