बंगळुरू : टिकटॉक या लोकप्रिय चीनी अॅपला टक्कर देण्यासाठी आणलेल्या ‘चिंगारी’ या देशी अॅपमध्ये टिंडर आणि ओएलएक्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवर्तकांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे या अॅपचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार होण्याची शक्यता बळावली आहे.
चिंगारी अॅपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित घोष यांनी ही माहिती दिली आहे. या अॅपमध्ये टिंडरचे मुख्य उत्पादन अधिकारी ब्रियान नोर्गार्ड आणि फ्रेंच उद्योगपती तसेच ओएलएक्सचे संस्थापक फेब्रिस ग्रिडा यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी किती रक्कम गुंतविली याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही. चिंगारी हा छोटे व्हिडिओ शेअर करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म असून, तो भारतीय कंपनीने विकसित केला आहे.
नोर्गार्ड यांनी यापूर्वी स्पेशएक्स, नोसलएचक्यू यासारख्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ग्रिडा यांनी अलीबाबा समूह, एअरबीएनबी, बीपी, पालांतीर आणि विडीन अशा सुमारे २०० उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे.
>चिंगारीचे काम नोर्गार्ड व ग्रिडा यांच्यासारख्या जागतिक पातळीवरील उद्योजकांना आवडले, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळेच त्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिंगारीचा विस्तार आंतरराष्टÑीय पातळीवर कसा करता येईल, याचे धडे आम्हाला मिळू शकतात.
- सुमित घोष, सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, चिंगारी अॅप
‘चिंगारी’त आली परदेशी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार शक्य
या अॅपचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार होण्याची शक्यता बळावली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:06 AM2020-08-20T03:06:12+5:302020-08-20T03:06:17+5:30