नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर असतानाच मंगळवार २१ मे रोजी भारतीय शेअर बाजाराने एकूण बाजार भांडवलाचा ५ ट्रिलियन डॉलर्सचा विक्रम नोंदवला. जगातील सर्वात मोठा पाचवा बाजार बनण्याचा लौकिक मिळवला. परंतु परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत ३७,००० कोटींची विक्री केली आहे.
निवडणूीक निकालाबाबत असलेल्या धास्तीमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु ठेवला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. १९ एप्रिलला निवडणुका सुरु झाल्या. त्यानंतर २१ व्यापार सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी दररोज सरासरी १८०० कोटींची विक्री केली आहे. निवडणूक निकालातील अनिश्चिततेमुळे बाजारातील चढ-उताराचे मोजमाप करणाऱ्या इंडेक्स इंडिया व्हीआयएक्स मध्ये ६७ टक्के वाढ झाली आहे. हा इंडेक्सचा मागील ५२ आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारीही शुद्ध १,८७४ कोटी रुपये इतक्या किमतीच्या शेअर्सची विक्री केली.
कशामुळे मिळतोय दिलासा? परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु ठेवला असला तरी देशांतर्गंत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास कायम दिसतो. त्यामुळे बाजारातील कसर भरून निघाली आहे. देशांतर्गत गंतुवणूकदारांनी जुनी खरेदी कायम ठेवली असून सातत्याने नवी खरेदीही सुरु ठेवली आहे. मागील २१ व्यापार सत्रांमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६० हजार कोटींची खरेदी केली आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत बाजाराशी निगडित म्युच्युअल फंडामध्ये जवळपास १.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. जमा असलेल्या या भांडवलामुळे विदेशी गुतंवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे निर्माण झालेला तणाव भरून निघण्यास मदत झाली आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांचा बाजारावर विश्वास - भारतीय बाजाराने सातत्याने चांगले यश संपादन केले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारावर दाखवलेल्या विश्वासामुळेच ही उंची गाठणे शक्य झाले आहे. अनेक चढउतारामध्येही त्यांचा बाजारावरील विश्वास कायम आहे. - सरकारच्या सुधारणा आणि कंपन्यांनी चांगली कामगिरी केल्याने बाजारावरील विश्वास वाढण्यास मदत झाली. यामुळेच बाजाराचे भांडवल पाच वर्षात १० ट्रिलियन डॉलर्सवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नेमकी कशाची भीती?तज्ज्ञांच्या मते, निवडणुका लक्षात घेता विदेशी गुंतवणूकदार कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत. २००४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी अनपेक्षितपणे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीने विजय मिळवला होता. अचानक झालेल्या या बदलामुळे शेअर बाजारात एकाच दिवसात १५ टक्के ची घसरला होता.