UPI Apps: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पेटीएम, गुगल पे, फोनपे अॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ही देशातील प्रमुख UPI अॅप्स आहेत. या अॅप्सद्वारे लोक पैसे देणे, बिल भरणे, गॅस, फ्लाइट, विमा, मोबाइल रिचार्ज, बँक ट्रांसफरसारखी सर्व प्रकारची कामे करतात. ही सर्व कामे आतापर्यंत मोफत केली जायची, पण आता यासाठी तुम्हाला काही रक्कम त्या UPI अॅपला द्यावी लागणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएम आणि गुगल पे शी संबंधित अपडेट आले आहे. या अॅप्सद्वारे तुम्ही तुमचा मोबाइल रिचार्ज केल्यास तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्मला ठरावीक फी भरावी लागेल. म्हणजेच मोबाईल रिचार्जच्या रकमेव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही पैसे द्यावे लागतील.
सोशल मीडियावरील अनेक युजर्स पेटीएमवरुन रिचार्ज केल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्म शुल्काचा स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. कंपनी रिचार्ज पॅकनुसार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शुल्क आकारत आहे. हे शुल्क पेमेंटनुसार 1 रुपये ते 6 रुपये आहे. तुम्ही एअरटेलवर एका वर्षासाठी 2,999 रुपयांचा रिचार्ज केल्यास, कंपनी तुमच्याकडून 5 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क घेईल.
Gadgets 360 च्या रिपोर्टनुसार, Google Pay ने देखील सर्व्हिस चार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे. कंपनी 749 रुपयांच्या प्लॅनवर 3 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारत आहे. कंपन्या हे शुल्क का आकारत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर कंपन्या UPI अॅपच्या सेवेच्या बदल्यात तुमच्याकडून हे शुल्क आकारत आहे.
Phonepe आधीपासून शुल्क आकारतेGoogle Pay आणि Paytm ने देखील फोन पेचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे आणि आता या दोन्ही कंपन्या प्लॅटफॉर्म फी आकारत आहेत. फोनपे बऱ्याच काळापासून मोबाईल रिचार्जवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारत आहे. यामुळे युजर्स फोन पे ऐवजी Google Pay आणि Paytm द्वारे रिचार्ज करण्यास प्राधान्य देत होते, परंतु आता या अॅप्सनीदेखील प्लॅटफॉर्म फी आकारण्यास सुरुवात केली आहे.