गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर दणकून नफा कमविणाऱ्या कंपन्या काही केल्या इंधनाचे दर कमी करण्याचे नाव घेत नाहीएत. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलचे दर चार रुपयांनी कमी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, परिस्थिती पाहता हे शक्य नसल्याचे दिसत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर बदललेल्याला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. एप्रिल २०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली होती. यामुळे पेट्रोलमागे ८ रुपये आणि डिझेलमागे ६ रुपयांची घट झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याचा किंमती वधारल्याने पेट्रोलियम कंपन्यांना पुन्हा तोटा होऊ लागला आहे. डिझेलमागे प्रति लीटर तीन रुपयांचा तोटा होऊ लागला आहे. तर पेट्रोलच्या फायद्यामध्ये घट झाली आहे. यामुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कपात करण्यास कचरत आहेत. पेट्रोलवरही कंपन्यांचा फायदा तीन ते चार रुपये प्रती लीटरवर आला आहे.
पेट्रोल, डिझेलमागे कंपन्यांना फायदा होत होता. त्यातच भारतीय कंपन्या रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल उचलत होत्या. ''तेल कंपन्या सर्व आर्थिक पैलूंचा विचार करून निर्णय घेतात. सरकार दर ठरवत नाही.'', असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले होते.