Join us

"दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा..," जड अंत:करणानं Go Firstच्या सीईओंचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 2:54 PM

खोना ऑगस्ट २०२० मध्ये सीईओ म्हणून गो फर्स्टमध्ये पुन्हा रुजू झाले होते.

विमान कंपनीनं दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी, बंद झालेल्या एअरलाइन गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कौशिक खोना यांनी राजीनामा दिला आहे. खोना यांनी गुरुवारी एअरलाइन कर्मचाऱ्यांना जड अंत:करणानं एक ईमेल पाठवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा कंपनीत शेवटचा दिवस आहे, असं त्यांनी ईमेलमध्ये नमूद केलं होतं. खोना ऑगस्ट २०२० मध्ये सीईओ म्हणून गो फर्स्टमध्ये आले होते.“जड अंतःकरणानं, मला तुम्हाला कळवायचं आहे की आज माझा कंपनीसोबतचा अखेरचा दिवस आहे. मला पुन्हा एकदा ऑगस्ट २०२० मध्ये गो फर्स्टसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या सोबत आणि सक्रिय पाठिंब्यानं मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला,” असं खोना यांनी ईमेलमध्ये म्हटलंय. यापूर्वी २००८ ते २०११ या कालावधीत ते गो फर्स्टसोबत होते.

त्यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. जर मी माझ्या कार्यकाळादरम्यान तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ कराल अशी मी अपेक्षा करतो, असं ते म्हणाले. गो फर्स्टनं मे महिन्याच्या सुरुवातीलाच उड्डाणं बंद केली आणि प्रामुख्याने प्रॅट आणि व्हिटनी इंजिनच्या समस्यांमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात ऐच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :व्यवसाय