भारताचे माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांच्या पत्नी वसुधा रोहतगी (Vasudha Rohatgi) यांनी दिल्लीतील गोल्फ लिंक्स येथे २,१६० स्क्वेअर यार्डचा बंगला खरेदी केला आहे. याची किंमत १६० कोटी रूपये आहे. सेल डीडनुसार या बंगल्याचा प्लॉट एरिया १८०६.३५ स्क्वेअर मीटर आहे. तसंच संपूर्ण इमारतीचे कव्हर एरिया १८६९.७ स्क्वेअर मीटर असल्याचं दिसून येतं. मनी कंट्रोलनं कागदपत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
या मालमत्तेची नोंदणी २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली आणि कुटुंबानं या घराच्या खरेदीसाठी ६.४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे. मुकुल रोहतगी यांनी या व्यवहाराला दुजोरा दिला आहे. घरांच्या मर्यादित उपलब्धतेमुळं दिल्लीचं गोल्फ लिंक्स हे श्रीमंत लोकांचं आवडतं ठिकाण आहे.
या व्यवहारासह, रोहतगी कुटुंब इतर कॉर्पोरेट व्यक्तींच्या यादीत सामील झाले ज्यांनी अलीकडेच दिल्लीतील महागड्या प्रॉपर्टी असेट्समध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी, भारताचे माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांनी लुटियन्सच्या दिल्लीतील सुंदर नगरमध्ये ८६६ स्क्वेअर यार्डचा विस्तीर्ण बंगला ८५ कोटी रुपयांना विकत घेतला. रेटगेनचे भानू चोप्रा, मॅक्सॉप इंजिनीअरिंगचे शैलेश अरोरा आणि डीबी ग्रुपचे पवन अग्रवाल यांसारख्या कॉर्पोरेट व्यक्ती रोहतगी कुटुंबाच्या शेजारीच वास्तव्यास असतील. चोप्रा यांनी नुकताच या भागात ८५० स्क्वेअर मीटरचा बंगला १२७.५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
दमानींनीही खरेदी केली मोठी प्रॉपर्टी
फेब्रुवारीमध्ये, डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची खरेदी केली. त्यांनी एकूण १,२३८ कोटी रुपयांना २८ निवासी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. ही आतापर्यंतची सर्वात मोठा प्रॉपर्टी डील म्हणून ओळखली जात आहे.
त्याच वेळी, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडनं निवासी प्रकल्प उभारण्यासाठी चेंबूरमध्ये राज कपूर यांचा बंगला विकत घेतला. अलीकडेच, DLF नं तीन दिवसांत गुरुग्राममधील एका उच्च श्रेणीतील निवासी प्रकल्पात 7 कोटी आणि त्याहून अधिक किंमतीच्या १,१३७ लक्झरी अपार्टमेंट्सची विक्री केल्याची माहिती दिली. याचं एकूण मूल्य ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.