फिनटेक फर्म भारतपे चे माजी एमडी अशनीर ग्रोव्हर यांच्या समस्या वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं अशनीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये नावं असलेल्या लोकांवर कलम ४०९, ४२०, ४६७ आणि १२० बी सह ८ कलमं लावण्यात आली आहेत.
जानेवारी २०२२ मध्ये आर्थिक अनियमिततांचा आरोप समोर आल्यानंतर अशनीर ग्रोव्हर आणि भारतपेदरम्यान कायदेशीर लढाई सुरू आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अशनीर ग्रोव्हरनं त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
८१ कोटींचं प्रकरण
डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली स्थित फिनटेक भारतपेनं अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दिल्लीपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये ८१.२८ कोटी रुपयांची फसवणूक, षडयंत्र रचणं आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप करण्यात आले होते. त्याच महिन्यात भारतपेनं दिल्ली उच्च न्यायालयातही एक खटला दाखल केला होता. यामध्ये अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून झालेल्या नुकसानीतून ८८.६७ कोटी रूपयांपेक्षा अधिक वसूलीची मागणी करण्यात आली होती.