नवी दिल्ली - एसबीआयच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या अतिरिक्त संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतंत्र संचालक म्हणून अरुंधती यांचा हा पदभार असणार आहे. त्यासाठी रिलायन्सच्या भागदारांकडून ना हरकत घेण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीला विरोध केल्यानंतर अरुंधती भट्टाचार्य चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
भागधारकांच्या मंजुरीनंतर 17 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या पूर्वदिनी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पुढील 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीकडून एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. भट्टाचार्य यांना फायनान्सियल क्षेत्रातील 40 वर्षे कामाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. अरुंधती यांच्या कार्यकाळातच एसबीआय आणि रिलायन्स बँकेच्या माध्यमातून डिजीटल पेमेंट सुविधा वाढविण्यात आली.
दरम्यान, शेतकरी संपावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन अरुंधती यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. 'शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास देशातील कर्जवाटप व वसुलीच्या शिस्तीला मोठा धक्का बसेल आणि भविष्यात हा पायंडाच पडून जाईल,' असे एसबीआयच्या तत्कालीन अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी म्हटले होते.