Join us

माजी पंतप्रधानांच्या रिफंडचे रेकॉर्ड नाही, पीएमओचे माहिती अधिकार अर्जावर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:18 AM

देशाच्या माजी पंतप्रधानांना मिळालेल्या प्राप्तिकर परताव्यांचे (इन्कम टॅक्स रिफंड) कोणतेही रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) नाही. एका माहिती अधिकार अर्जावर पीएमओने ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधानांना मिळालेल्या प्राप्तिकर परताव्यांचे (इन्कम टॅक्स रिफंड) कोणतेही रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) नाही. एका माहिती अधिकार अर्जावर पीएमओने ही माहिती दिली आहे.पीटीआय वृत्तसंस्थेने या संबंधीचा अर्ज पीएमओकडे सादर केला होता. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या प्राप्तिकर परताव्यांची माहिती अर्जात मागण्यात आली होती. त्याच्या उत्तरात पीएमओने म्हटले की, आपल्याकडे यासंबंधीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राप्तिकर परताव्यांची माहितीही अर्जात मागण्यात आली होती. ही माहिती देण्यास पीएमओने नकार दिला आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये ही माहिती सामायिक करण्यापासून सुरक्षित आहे, असे पीएमओने आपल्या उत्तरात म्हटले आहे. वैयक्तिक स्वरूपाची माहिती जाहीर करता येत नाही.माहिती वैयक्तिक स्वरूपाची असून माहिती अधिकार कायद्याचे कलम ८(१)(जे) अन्वये ती सुरक्षित आहे, असे पीएमओने म्हटले आहे.प्राप्तिकर विभागाच्या टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्कवर आॅनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील १८ वर्षांत पाच वेळा प्राप्तिकर परतावे मिळाले आहेत....................अशा आहेत कलम ८(१)(जे) मधील तरतुदी- कलम ८(१)(जे) या कलमान्वये वैयक्तिक स्वरूपाची माहिती अथवा सार्वजनिक कृतीशी किंवा हिताशी संबंधित नसलेली माहिती उघड करता येत नाही. ज्या माहितीने कोणाच्याही वैयक्तिक अधिकारांचे हनन होत नाही, अशी माहितीही जाहीर करण्यापासून सुरक्षित आहे.- वैयक्तिक स्वरूपाची माहिती व्यापक सामाजिक हितासाठी सार्वजनिक करणे आवश्यक आहे, याची खात्री जोपर्यंत केंद्रीय माहिती अधिकारी अथवा राज्य माहिती अधिकारी किंवा अपील प्राधिकरण यांना जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत जाहीर केली जाऊ शकत नाही, अशी तरतूद या कलमात आहे.- याच कलमात पुढे असे म्हटले आहे की, जी माहिती संसद अथवा राज्य विधानसभा यांना नाकारली जाऊ शकत नाही, ती माहिती सामान्य नागरिकांनाही नाकारली जाऊ शकत नाही....................