केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा खरपूस समाचार घेतला. राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर असताना संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली होती, असा आरोप त्यांनी केला. रघुराम राजन यांनी अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. तसंच अलिकडेच त्यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएलआय योजनेवर प्रश्न उपस्थित केले होते.
ही अयशस्वी होणारी योजना आहे, असं एका रिसर्च पेपरमध्ये म्हटलं आहे. उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि देशात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने विविध क्षेत्रांसाठी १.९७ लाख कोटी रुपयांच्या उत्पादन लिंक्ड इनिशिएटिव्ह योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी राजन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतदेखील सहभागी झाले होते. जर २०२३-२४ मध्ये भारताची जीडीपी ग्रोथ ५ टक्के असली तरी भाग्यवान असेल असं ते त्यावेळी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते. परंतु नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही वाढ ७.२ टक्के राहणार आहे. यानंतर राजन यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
"ते एक अयशस्वी राजकारणी आहेत की अयशस्वी अर्थतज्ज्ञ हे त्यांनी ठरवावं. जेव्हा ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर होते तेव्हा त्यांनी संपूर्ण बँकिंग सिस्टम आणि फायनॅन्शिअल सेक्टर उद्ध्वस्त केलं होतं," असा आरोप चंद्रशेखर यांनी केला.
VIDEO | “We all know that when he (Raghuram Rajan) was the RBI governor, he wrecked the entire banking system,” says Union Minister @Rajeev_GoI. pic.twitter.com/fRLkPe5WxG
— Press Trust of India (@PTI_News) June 9, 2023
भ्रष्टाचाराचं दुकान
दरम्यान, यावेळी चंद्रशेखर यांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान या घोषणेवरूनही टीकेचा बाण सोडला. "काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारदरम्यान भ्रष्टाचाराचं दुकान दिसून आलं," असं म्हणत त्यांनी टीका केली. तसंच त्यांना विदेशी पर्यटक असंही संबोधलं.