Join us

१-२ हजार सोडा, देशात ५ अन् १० हजारांची नोट येणार होती! रघुराम राजन यांचा प्रस्ताव का नाकारला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 2:43 PM

Withdrawal of 2000 Rupee Note: रघुराम राजन यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.

Withdrawal of 2000 Rupee Note:भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी घोषित केल्यानंतर ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून नवीन २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. यानंतर आता २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतली जात आहे. २ हजारांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, यातच आता देशात ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण तो फेटाळण्यात आला. 

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आला नाही. सन २०१६ मध्ये नोटाबंदी करण्यात आली. त्याचवेळी २ हजार रुपायांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, त्यापूर्वी १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. रघुराम राजन यांनी ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची सूचना केली होती. देशातील वाढत्या महागाईमुळे १ हजार रुपयांच्या नोटेचे मूल्य कमी झाले आहे. अनियंत्रित महागाई आटोक्यात आणण्यासाठी राजन यांनी मोठ्या नोटा छापण्याची शिफारस केली होती.

१० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची शिफारस स्वीकारली नाही

आरबीआयने लोकलेखा समितीला दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर २०१४ मध्ये ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा आणण्याबाबत सुचवले होते. त्यानंतर माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली म्हणाले होते की, सरकारने ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची शिफारस स्वीकारली नाही. यानंतर सरकारने RBI ला २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या निर्णयाची माहिती दिली.

दरम्यान, सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना रघुराम राजन म्हणाले होते की, बनावट नोटेच्या भीतीमुळे जास्त मूल्य असलेल्या नोटा चलनात ठेवणे कठीण आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये राजन यांनी चिंता व्यक्त केली होती की, जर आपण खूप मोठ्या नोटा छापल्या तर बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर तयार होतील.

 

टॅग्स :रघुराम राजनभारतीय रिझर्व्ह बँक