Former RBI Governor Urjit Patel : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल (Former RBI Governor Urjit Patel) यांनी पॅकेज्ड फूड कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडमधील (Britannia Industries Limited) गैर-कार्यकारी आणि स्वतंत्र संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. “कंपनीच्या बोर्डाचा एक भाग असल्याचा आनंद आहे. पुढील महिन्यापासून माझ्या नवीन पूर्णवेळ नियुक्तीमुळे, मला ३१ तारखेपासून ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागत आहे," असं ऊर्जित पटेल म्हणाले.
अलीकडेच ऊर्जित पटेल यांची बीजिंग स्थित एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) मध्ये दक्षिण आशियातील गुंतवणूक ऑपरेशन्ससाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऊर्जित पटेल यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, वैयक्तिक कारणास्तव त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ब्रिटानियाच्या नफ्यात घट
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ या तिमाहीत ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा १८.४ टक्क्यांनी घसरून ३६९.१८ कोटी रुपयांवर आला आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं कंपनीचा नफा कमी झाला आहे. ब्रिटानियानं मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ४५२.६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.
परंतु, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न १२.९३ टक्क्यांनी वाढून ३,५७९.९८ कोटी रुपये झालं आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते ३,१६५.६१ कोटी रुपये होते. ब्रिटानियाचा एकूण खर्च या तिमाहीत १८.५४ टक्क्यांनी वाढून ३,१२३.०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो २,६३४.४६ कोटी रुपये होता.