रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी नागरी सेवेत सुधारणा आणि पुनर्रचनेचं समर्थन केले आहे. इंग्रजांनी उभ्या केलेल्या 'स्टील स्ट्रक्चर'ला गंज लागला आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. केंद्रीय अर्थसचिवांसह विविध महत्त्वाची पदे भूषविलेल्या सुब्बाराव यांनी पीटीआयशी साधलेल्या संवादादरम्यान यावर भाष्य केलं. याशिवाय 'जस्ट अ मर्सिनरी' नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केलाय.
"नोकरशाहीच्या स्ट्रील स्ट्रक्चरला निश्चितच गंज लागला आहे. आयएएस, भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते," असं सुब्बाराव म्हणाले.
सुधारणांची आवश्यकता
"मोठं आकारमान आणि विविधता असलेल्या आपल्या देशात आताही आयएएस सारख्या सेवांची गरज आहे. परंतु त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे आणि त्याला नवं रुप देण्याचीही आवश्यकता आहे," असं सुब्बाराव म्हणाले. "त्यावर उपाय म्हणजे गंजलेली वस्तू फेकून देणं नव्हे, तर तिची मूळ चमक पूर्ववत करणं हा आहे. काळाच्या ओघात आयएएसनं आपले स्वरूप आणि मार्ग गमावला आहे," असंही त्यांनी नमूद केलंय.
हा नकारात्मक दृष्टिकोन अधिकाऱ्यांच्या एका गटानं तयार केला आहे. परंतु, चिंतेची बाब म्हणजे तो गट आता लहान राहिलेला नसल्याचंही सुब्बाराव म्हणाले.