टाटा उद्योग समुहाचे एकनिष्ठ आणि टाटा संसचे माजी संचालक आरके कृष्णकुमार यांचे रविवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कृष्णकुमार यांना पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले होते. हार्ट अॅटॅक आल्याने त्यांचे मुंबईत निधन झाले. टाटाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कृष्णकुमार यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळली होती. टाटा समुहाच्या अनेक डीलमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. कृष्णकुमार यांना 2009 मध्ये भारत सरकारने भारतीय व्यवसाय आणि उद्योगातील योगदानासाठी चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान केला होता.
कृष्णकुमार यांना श्रद्धांजली वाहताना रतन टाटा भावूक झाले होते. 'माझा मित्र आणि सहकारी आरके कृष्णकुमार यांच्या निधनाने मला जे नुकसान झाले आहे ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्ही ग्रुपमध्ये आणि वैयक्तिकरित्या केलेले सौहार्द मला नेहमी लक्षात राहील. ते टाटा समूह आणि टाटा ट्रस्टचे खरे दिग्गज होते. त्यांची कमतरता नेहमी जाणवेल', असे टाटा म्हणाले.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही कृष्णकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कृष्णकुमार यांनी टाटा समूहात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. टाटा समूहाच्या 'इंडियन हॉटेल्स'चे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कृष्णकुमार 1963 मध्ये टाटाच्या प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. 1965 मध्ये, त्यांची टाटा ग्लोबल बेव्हरेजेसमध्ये बदली करण्यात आली होती, तेव्हा ती कंपनी टाटा फिनले म्हणून ओळखली जात होती. त्यांनी टाटा चहाच्या री-ब्रँडिंगसाठी काम केले.