Lokmat Money > बिझनेस न्यूज > “वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका

“वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका

भारतीय समाजामधील वाढते मतभेद आणि ध्रुवीकरण दु:खदायी बाब असून, महागाई गेल्या २४ वर्षांत इतक्या उच्चांकावर गेली नव्हती, असे कौशिक बासू यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 01:44 PM2022-05-25T13:44:56+5:302022-05-25T13:45:49+5:30

भारतीय समाजामधील वाढते मतभेद आणि ध्रुवीकरण दु:खदायी बाब असून, महागाई गेल्या २४ वर्षांत इतक्या उच्चांकावर गेली नव्हती, असे कौशिक बासू यांनी म्हटले आहे.

former world bank chief kaushik basu criticize govt and said polarization damaging india growth | “वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका

“वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशात महागाई, बेरोजगारी, जातीयतावाद, धार्मिकता यासह अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपचे मोदी सरकार आणि सर्व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी वाढताना दिसत आहेत. महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या विषयांपासून पळ काढण्यासाठी भाजप आणि मोदी सरकार भावनिक, धार्मिकतेचे नानाविध मुद्दे उकरून काढत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यातच आता जागतिक बँकेचे माजी प्रमुख आणि अर्थतज्ज्ञ कौशिक बासू (Kaushik Basu) यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचे निरीक्षण बासू यांनी नोंदवले आहे. 

रिझर्व्ह बँकेचे धोरण 'सीपीआय' महागाईशी निगडित असते. भारतासमोरील मोठे आव्हान घाऊक महागाई नियंत्रणात आणण्याचे आहे. देशाला बेरोजगारीचा मोठा धोका आहे. पुरवठा साखळी नीट होणे आवश्यक असून, छोटे उद्योग, कामगार, शेतकरी यांना थेट मदत गरजेची आहे. गरिबांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेच्या पलीकडे जाऊन धोरणे आखण्याची गरज असल्याचे बासू यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

देशातील महागाई हा जागतिक स्थितीचा परिणाम

देशातील महागाई हा जागतिक स्थितीचा परिणाम आहे. कोरोनाची साथ आणि युक्रेन-रशिया युद्ध यांमुळे पुरवठासाखळी विस्कळीत झाली आहे. महागाईचे कारण भारताबाहेर असले, तरी देशातील गरिबांच्या आणि मध्यमवर्गाच्या सुरक्षेसाठी आपण पुरेसे उपाय करीत नाही. देशातील किरकोळ आणि घाऊक महागाईने आजवरचा उच्चांक गाठला आहे. घाऊक महागाई गेल्या २४ वर्षांत इतक्या उच्चांकावर गेली नव्हती, असे बासू यांनी सांगितले.

वाढते मतभेद आणि ध्रुवीकरण ही केवळ दु:खदायी बाब

देशाची आर्थिक वाढ केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नसते. नागरिकांमधील एकमेकांवरील विश्वास हा देशाच्या आर्थिक यशाचा महत्त्वाचा घटक असतो, हे दाखविणारे पुरावे आहेत. भारतीय समाजामधील वाढते मतभेद आणि ध्रुवीकरण ही केवळ दु:खदायी बाब नाही, तर देशाच्या आर्थिक विकासाच्या मूळ रचनेचेच त्यामुळे नुकसान होत आहे, या शब्दांत देशातील परिस्थितीबाबत सरकारवर चपराक लगावताना, भारतामध्ये आर्थिक विकासासाठीचा पाया अत्यंत मजबूत आहे. मोठा उद्योगप्रिय समाज, कुशल कामगार, जीडीपी आणि गुंतवणुकीचा चांगला दर येथे आहे, असे बासू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, १९९०च्या दशकात जे झाले होते, तेव्हाच्या परिस्थितीशी साधर्म्य दाखविणारे आहे. त्या वेळी पूर्व आशियामधील संकटाचा देशावर परिणाम झाला होता, असे सांगत ग्राहक किंमत निर्देशांकात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. घाऊक महागाईप्रमाणे ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) दोन आकडी होणार नाही, याकडे आपण तातडीने लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले. 
 

Web Title: former world bank chief kaushik basu criticize govt and said polarization damaging india growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.