Join us

फॉर्म्युला... ५० हजार पगारवाल्यांनी अशी करावी बचत; दरमहा करा एवढी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 9:23 AM

एखाद्या व्यक्तीस २० हजार रुपये पगार असेल किवा ५० हजार रुपये पगार असेल, तर त्यांच्या गरजा किंवा खर्चही त्यानुसारच होत असतो

तुमचा पगार वाढली की खर्चही वाढत जातो. त्यामुळे, पैशांची बचत करण्याची योजना फक्त डोक्यातच राहते. ती प्रत्यक्षात कृतीत लवकर उतरतच नाही. मात्र, वाढत्या पगारातून पैशांची बचत करणे गरजेचे असते. भविष्यातील मोठ्या खर्चांसाठी किंवा वृद्धापकाळासाठी या बचतीचा लाभ होतो. त्यामुळे, सध्या तुम्हाला जेवढा पगार मिळतो, तेवढ्या पगारातून बचत करायला शिकलं पाहिजे. बचतीचा मार्ग अवलंबवला पाहिजे, म्हणजे भविष्यातील योजना आखताना अडचण निर्माण होत नाही. 

एखाद्या व्यक्तीस २० हजार रुपये पगार असेल किवा ५० हजार रुपये पगार असेल, तर त्यांच्या गरजा किंवा खर्चही त्यानुसारच होत असतो. त्यामुळे, महिन्याच्या अखेरीस पैशांची बचत होत नाही. आज या लेखातून तुम्हाला बचत किती आणि कशी करावी याची माहिती दिली जाणार आहे. 

२० हजार पगार असलेल्यांसाठी 

ज्यांच्या मासिक पगार २० हजार रुपये आहे, त्यांनीही बचत करायला हवी. सर्वप्रथम पगार होताच बचतीसाठी ठरवलेली रक्कम दुसऱ्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करायला हवी. सुरुवातीला तुम्ही पगारीच्या १० टक्के रक्कम बचत म्हणून टाकू शकता. म्हणजेच, सुरुवातीचे ६ महिने प्रत्येकी २ हजार रुपयांची बचत करता येईल. दरम्यान, सध्याच्या काळात बहुतांश नोकरदारांची पगार ५० हजार रुपयांपर्यंत आहे. त्यांनी बचतीचे प्लॅनिंग कसे करावे हेही महत्त्वाचे आहे. 

५० हजार पगार असलेल्यांसाठी

तुमचं लग्न झालं आहे, तुम्हाला दोन मुलं आहेत. तर, ५० हजार रुपयांच्या पगारातून तुम्ही बचत करू शकता. प्रत्येक महिन्याला तुम्ही ३० टक्के रक्कम बचत केली पाहिजे. म्हणजेच, दर महिन्याला १५ हजार रुपयांची बचत झालीच पाहिजे. जर, तुम्ही १५ हजार रुपये महिना बचत करत नसाल, तर तुमच्या पगारानुसार बचतीचे लक्ष्य साध्य होत नाही. याबाबतीत निश्चितच विचार केला पाहिजे. ५० हजार रुपये पगारवाले लोग वर्षाला १.८० लाख रुपये बचत करू शकतात. दर महिन्याला ५ हजार रुपये इमर्जन्सी सेव्हींगसाठी ठेवावे. तर, ५ हजार रुपये म्युच्युअर फंडद्वारे एसआयपी सेव्हींगमध्ये टाकावेत. उर्वरीत ५ हजार रुपये सोनं किंवा रेकरिंग डिपॉझिटमध्ये टाकावेत. 

बचत कशी करावी

सुरुवातीच्या काळात पगाराच्या १० टक्के बचत करावी. म्हणजे, पहिल्या ६ महिन्यात पगाराच्या १० टक्के रक्कम बचत करावी. ६ महिन्यांनंतर हळू हळू ती रक्कम वाढवून ३० टक्के महिना बचतीपर्यंत न्यायला हवी. सुरुवातीला तुम्ही अत्यंत गरजेच्या खर्चाची यादी बनवा. त्यानंतर, दुय्यम खर्चावर विचार करा, अनावश्यक दुय्यम खर्चाला कायमची कात्री देऊ शकता. त्यातून, बचतीत वाढ होईल. जर तुम्ही महिन्यातून ४ वेळा बाहेर जेवणासाठी जात असाल, तर ते केवळ २ वेळाच जायला हवे. एका सर्वेक्षणानुसार प्रत्येकाच्या पगारीतील १० टक्के रक्कम अनावश्यक गोष्टींवर खर्च केली जाते.  

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बँकगुंतवणूकनोकरी