Join us

२२ व्या वर्षी उभी केली कंपनी; २९ व्या वर्षी ११,१९६ वर्षांचा तुरुंगवास, आता शिखरावरून शून्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 2:05 PM

त्याच्या भावा-बहिणीलाही तितकीच शिक्षा सुनावण्यात आलीये. वाचा नक्की काय आहे प्रकरण.

गेल्या काही वर्षांत जगभरात क्रिप्टोकरन्सीच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र यासोबतच गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणंही समोर आली आहेत. तुर्कस्तानमधील थोडेक्स (Thodex) क्रिप्टोकरन्सीचा बॉस फारुख फातिह ओझर याला गुंतवणूकदारांची लाखो डॉलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी ११,१९६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

त्याच्या एका भावाला आणि बहिणीलाही इतकीच शिक्षा झाली. २९ वर्षीय ओझरची कंपनी थोडेक्स २०२१ मध्ये अचानक बुडाली आणि तो गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन अल्बेनियाला पळून गेला. परंतु नंतर इंटरपोलच्या वरंटवर अल्बानियातून अटक करून तुर्कस्तानात आणण्यात आलं. त्यानंतर त्याला मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तुर्कस्तानात मृत्युदंडावर बंदी आहे. त्यामुळेच ओझरला एवढी मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भाऊ, बहिणही दोषीओझरने स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटलं. तो म्हणाला, मी इतका हुशार आहे की मी जगातील कोणतीही कंपनी चालवू शकतो. मी वयाच्या २२ व्या वर्षी कंपनी सुरू केली होती हे यावरून समजू शकतं. मात्र न्यायालयानं त्याचा युक्तिवाद फेटाळून लावत त्याला कठोर शिक्षा सुनावली. ओझरसोबतच त्याची बहीण आणि भाऊही दोषी आढळले असून त्यांनाही हीच शिक्षा देण्यात आली आहे.

मोठी शिक्षा का?एकूण २०२७ जणांविरोधातील गुन्ह्यात स्वतंत्रपणे शिक्षा सुनावण्यात आली. यामुळेच ओझर आणि त्याच्या भावंडांना ११,१९६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकिलांनी ओझरला ४०,५६२ वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती. तुर्कस्तानात अशा प्रकारची शिक्षा सामान्य आहे. २००४ मध्ये देशात फाशीच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली होती. २०२२ मध्ये, अदनान ओख्तर या धार्मिक गुरूला आणि त्याच्या शिष्यांनाही ८,६५८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

चलन घसरलंदोन वर्षांपूर्वी तुर्कस्तानचं चलन लिरामध्ये मोठी घसरण सुरू झाली. हे टाळण्यासाठी लोकांनी क्रिप्टोकरन्सी वापरण्यास सुरुवात केली. Thodex ची सुरुवात २०१७ मध्ये झाली होती आणि ती देशातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक होती. त्यामुळे ओझर स्टार झाला आणि देशाच्या सत्तास्थापनेशी त्याची जवळीक वाढू लागली. परंतु २०२१ मध्ये ही कंपनी अचानक बुडाली. गुंतवणूकदारांचे पैसे गायब झाले आणि ओझर फरार झाला. गेल्या वर्षी त्याला इंटरपोलच्या वॉरंटवर अल्बानियामधून अटक करण्यात आली होती आणि दीर्घ प्रक्रियेनंतर त्याला तुर्कस्तानात आणण्यात आलं.

कितीचा घोटाळाओझर दोन अब्ज डॉलर्स घेऊन फरार झाल्याचा दावा तुर्कस्तानातील माध्यमांनी केला होता. परंतु कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, थोडेक्सच्या गुंतवणूकदारांना सुमारे ३५.६ कोटी लीराचा फटका बसल्याचं उघड झालं. जेव्हा एक्सचेंज कोसळलं तेव्हा ही रक्कम ४३ कोटी डॉलर्स इतकी होती, परंतु सध्याच्या हिशोबानं ती १.३ कोटी डॉलर्स इतकी आहे. याचं कारण म्हणजे अलीकडेच तुर्कस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात लीराच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे.

टॅग्स :व्यवसायक्रिप्टोकरन्सी