Join us

देशातील रस्त्यांवर चार कोटी जुनी वाहने, कर्नाटक अव्वल स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 7:36 AM

old vehicles : देशभरामध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली चार कोटी वाहने धावत असून, या वाहनांवर हरित कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी या वाहनांची एकूण संख्या आणि अन्य बाबींची महिती एकत्रित केली जात आहे.

नवी दिल्ली - देशभरामध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली चार कोटी वाहने धावत असून, या वाहनांवर हरित कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी या वाहनांची एकूण संख्या आणि अन्य बाबींची महिती एकत्रित केली जात आहे. देशातील जुन्या वाहनांपैकी सर्वाधिक वाहने ही कर्नाटकमध्ये असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.  (Four crore old vehicles on the roads of the country, Karnataka tops the list)केंद्रीय सडक आणि राजमार्ग मंत्रालयाने देशामध्ये धावत असलेल्या १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सध्या देशातील रस्त्यांवर चार कोटी जुनी वाहने धावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यापैकी दोन कोटी वाहने ही २० वर्षे जुनी आहेत. या वाहनांमुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असते. त्यामुळे राज्यांनी जुन्या वाहनांवर हरित कर लावावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीप या राज्यांमधील वाहनांचा समावेश नाही. या राज्यांची माहिती अद्याप संकलित झालेली नाही. ही माहिती हाती आल्यानंतर या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या वाहनांच्या आकडेवारीमध्ये कर्नाटक अव्वल स्थानावर आहे. या राज्यांमध्ये जुन्या वाहनांची संख्या ७०  लाख एवढी आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या राज्यातील जुन्या वाहनांची संख्या ५६.५४ लाख असून, यापैकी २४.५५ लाख वाहने ही २० वर्षे जुनी आहेत. दिल्ली या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर ४३.९३ लाख जुनी वाहने धावत आहेत. यापैकी २० वर्षांच्या वाहनांची संख्या ३५. ११ लाख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी महिन्यामध्ये प्रदूषण निर्माण करणाऱ्या वाहनांवर हरित कर लावण्याचा प्रस्ताव दिला असून, तो राज्यांकडे पाठविण्यात आला आहे. राज्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर तो लागू केला जाणार आहे. सध्या काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या दरांनी हरित कराची आकारणी केली जात आहे. या प्रस्तावामध्ये आठ वर्षांहून जुन्या वाहनांच्या नूतनीकरणाच्या वेळी पथकराच्या १० ते २५ टक्क्यांपर्यंत नवी न कर लावला जाणार आहे. यामुळे प्रदूषण निर्माण करणारी वाहने मोडीत काढली जाऊन देशाच्या प्रदूषणाच्या समस्येला काही प्रमाणात आळा घालता येणार आहे.  

...अशी आहे राज्यांमधील जुन्या वाहनांची संख्याn कर्नाटक : ७० लाख, उत्तर प्रदेश : ५६.५४ लाख, दिल्ली : ४३.९३ लाख, केरळ : ३४.६४ लाख, तामिळनाडू ३३.४३ लाख, पंजाब : २५.३८ लाख, पश्चिम बंगाल : २२.६९ लाख, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये जुन्या वाहनांची संख्या १७.५८ ते १२.२९ लाखांच्या दरम्यान आहे. nझारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, आसाम, बिहार, गोवा, त्रिपुरा आणि दादरा नगर हवेलीमध्ये वाहनांची संख्या ५.४४ लाख ते १ लाख यादरम्यान आहे. अन्य राज्यांमध्ये असलेली संख्या एक लाखांपेक्षा कमी आहे.nजुन्या वाहनांमुळे होणा-या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर हरित कर लावण्याचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :रस्ते वाहतूकवाहतूक कोंडी