नवी दिल्ली : मार्च महिन्यात देशातील चलनवाढ ही ५.५२ टक्के अशी चार महिन्यांमधील उच्चांकी पोहोचली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादनामध्येही घट झाल्याने अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये अडथळे येत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने चलनवाढ आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये किरकोळ वस्तूंच्या किमतीवरील चलनवाढीचा दर ५.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चार महिन्यांमधील हा उच्चांकी दर आहे. फेब्रुवारी महिन्यात चलनवाढीचा दर ५.०३ टक्के होता. अन्नधान्य तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे चलनवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनामध्ये घट झाली आहे. या महिन्यांत हे उत्पादन ३.६ टक्क्यांनी कमी झाले आहे. याआधी जानेवारी महिन्यामध्येही औद्योगिक उत्पादनात ०.९ टक्क्यांनी घट झाली होती. सलग दुसऱ्या महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन घटलेले असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. डिसेंबर महिन्यात यामध्ये किरकोळ वाढ झाली होती.
चलनवाढीत चार महिन्यांमधील उच्चांकी; औद्योगिक उत्पादन घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:43 AM