जागतिक मंदीची कमी झालेली भीती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली सुधारणा, पंतप्रधानांनी उद्योजकांशी चर्चा करून दिलेला दिलासा, सरकारने बाजारात वाढ होण्यासाठी घेतलेले चांगले निर्णय, सुधारलेले औद्योगिक उत्पादन अशा विविध घटकांनी गेल्या चार सप्ताहांची बाजाराची घसरण थांबविण्यात यश मिळविले.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह तसा तेजीचाच राहिला. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक थोडा कमी झाला असला तरी आधीच्या वाढीच्या तुलनेत ही घसरण कमीच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस ४०८.३१ अंश (१.६२ टक्के) वाढून २५६१०.२१ अंशांवर बंद झाला. बाजाराचे बहुसंख्य क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगामध्ये बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.७५ टक्के म्हणजेच १३४.२५ अंशांनी वाढून ७७८९.३० अंशांवर बंद झाला. बाजारात काही प्रमाणात खरेदी होत असल्याने बाजाराला चालना मिळाली आणि निर्देशांकांच्या घसरणीला सुमारे महिन्यानंतर ब्रेक लागला. परकीय वित्तसंस्थांची विक्री मात्र सुरूच आहे.
जागतिक मंदीचे संकट काही प्रमाणात धूसर होऊ लागल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये सुधारणा दिसून आली. त्यातच चीनने आपल्या २०१४ च्या वार्षिक वृद्धीचा दर ७.३ टक्के राहिल्याचे जाहीर केले. चीनची डोकेदुखी ठरत असलेली आयातही काही प्रमाणात कमी झाल्याने जगभरातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आगामी सप्ताहात होत असलेली अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक मात्र बाजारावर परिणाम करू शकेल. या बैठकीत व्याजदराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
देशातील गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी देशातील प्रमुख उद्योजक आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने गुंतवणूकदारांना काहीसा धीर आला आहे. यापाठोपाठच केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना दिलासा देणारे काही निर्णय गतसप्ताहात घेतले. त्यामध्ये सुवर्ण रोखे आणि गोल्ड मॉनेटायजिंग पॉलिसीचा समावेश आहे. यामुळे देशातील सोन्याची आयात काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
गतसप्ताहात जाहीर झालेली औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी आशादायक असून, आता रिझर्व्ह बँकेला व्याजदरामध्ये कपात करणे शक्य होण्याची स्थिती असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
अनुकूल वातावरणाने चार सप्ताहांच्या घसरणीला ब्रेक
जागतिक मंदीची कमी झालेली भीती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली सुधारणा, पंतप्रधानांनी उद्योजकांशी चर्चा करून दिलेला दिलासा, सरकारने बाजारात वाढ होण्यासाठी घेतलेले चांगले निर्णय
By admin | Published: September 14, 2015 12:57 AM2015-09-14T00:57:30+5:302015-09-14T00:57:30+5:30